Sangavi News : सांगवी गोळीबार प्रकरण! जखमी इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू 

एमपीसी न्यूज – सांगवीतील काटेपुरम चौकात आज (दि.18) सकाळी साडेदहाच्या सुमारास गोळीबार झाला. यात योगेश जगताप हा गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्यावर एकूण चार गोळ्या झाडल्या, त्यापैकी दोन त्याच्या छातीत लागल्याची माहिती सांगवी पोलिसांनी दिली. 

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये दोन आरोपी योगेश यांच्यावर गोळीबार करताना दिसत आहेत. गणेश मोटे असे एका संशयित आरोपीचे नाव असल्याची माहिती मिळतेय. मयत योगेश जगताप आणि संशयित आरोपी दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. जगताप याला यापूर्वी तडीपार करण्यात आले होते. तो लोकांना व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करायचा अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटनेची अधिक माहिती अशी की, आज दत्त जयंतीनिमित्त योगेश जगताप याने काटेपुरम चौकात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सकाळी तो कार्यक्रमाच्या ठिकाणी आला. सकाळी साडेदहा वाजता एकाने त्याच्यावर फायरिंग केलं. जगताप पळत सुटला, त्यांच्यात झटापट देखील झाली अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. आरोपीने जगताप याच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या असून पैकी दोन त्याला लागल्या.

गोळीबार केल्यानंतर आरोपींनी रस्त्यावरील दुचाकीस्वाराला बंदुकीचा धाक दाखवून त्याची दुचाकी पळवून नेली आहे. ही माहिती मिळताच सांगवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकले नाही. पण, वर्चस्वादातून हा गोळीबार झाल्याची चर्चा परिसरात आहे.

दरम्यान, सांगवीतील काटेपुरम चौक नेहमीच गजबजलेला असतो. त्यात आज दत्तजयंती मुळे नागरिक दर्शनासाठी सकाळपासूनच बाहेर पडत होते. सकाळीच गोळीबार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.