PCMC Guidelines : नैसर्गिक आपत्तीपासून जीवितहानी टाळण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करा, महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज  – राज्यात मान्सून कालावधीत (PCMC Guidelines) वीज पडणे, वज्राघात होणे अशा घटना घडतात. त्यामुळे जीवित व वित्त हानी होत असते. अशा नैसर्गिक आपत्ती पासून जीवित हानी आणि वित्त हानी टाळण्यासाठी नागरिकांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आणि महापालिकेमार्फत देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले आहे.  

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याद्वारे नागरी पूर आपत्ती प्रसंगी पूर्वतयारी व प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत जनजागृती करण्यासाठी मार्गदर्शक सूचना प्रसारित करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने वीज पडणे, पूर परिस्थिती अशा प्रसंगी काय करावे व काय करू नये यासाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

वज्राघात – या परिस्थितीमध्ये काय करावे आणि काय करू नये, याबाबत मार्गदर्शक सूचना .

सतर्कतेची चिन्हे – चेतावणी चिन्हे : यापरिस्थितीत वारे अतिशय वेगवान असतात, काळे ढग आणि अति पर्जन्य वृष्टी होते. घोंघावणारे गडगडाटी वादळ, जवळचे झंझावात जास्त किंवा अधिक प्रमाणात मेघगर्जना

वस्तुस्थिती – PCMC Guidelines

वीज ही सामान्यपणे उंच वस्तूवर पडते. कोणतेही स्थान हे पूर्णपणे सुरक्षित नाही. परंतु, काही स्थान हे इतर ठिकाणापेक्षा जास्त सुरक्षित आहेत. मोठी बांधकामे छोट्या किंवा खुल्या बांधकामापेक्षा जास्त सुरक्षित असतात. तसेच जास्त पाऊस पडणाऱ्या क्षेत्राच्या बाहेरही १६ कि.मी पर्यंत वज्राघात होऊ शकतो, बाहेर पडलेल्या व्यक्तीचा वज्राघातामुळे जखम किंवा मृत्त्यू होऊ शकतो, वज्राघात बाधित किंवा त्यामुळे जखमी झालेल्या व्यक्तीच्या शरीरात कुठल्याही प्रकारचा विद्युत प्रवाह सुरु नसतो. त्यासाठी तुम्ही त्याला मदत करू शकता, अशा व्यक्तीस तात्काळ मदत करावी.

वज्राघातापासून बचावासाठी करावयाची पूर्व तयारी :

आपल्या भागातील स्थानिक हवामानाविषयी अंदाजाची व सतर्कतेची माहितीचे निरीक्षण करावे. स्वत:च्या  व कुटुंबाच्या बचावासाठी वज्राघाताच्या आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय स्थानिक प्रशासकीय यंत्रणा, स्थानिक आपात्कालीन सेवांचे संपर्क तपशील जवळ ठेवावे. आपत्कालीन साधने (Emergency Kit) तयार ठेवणे, जर गडगडाटी वादळाचा, अतिवेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांचा अंदाज असेल तर घराबाहेर जाणे किंवा घराबाहेरील क्रिया पुढे ढकलणे, विजेवर चालणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रीक व इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि वातानुकुलीत यंत्रे बंद ठेवणे, आपल्या घराच्या आजूबाजूची वाळलेली झाडे किंवा मृत झाडे यांच्या फांद्या काढुन टाकणे अशी काळजी नागरिकांनी घ्यायची आहे.

तुमच्या परिसरात वादळी वारे, गडगडाटी वारे,  वीजा चमकत असल्यास घ्यावयाची काळजी :-

घरात असल्यास करावयाच्या उपाययोजना : घराच्या खिडक्या व दरवाजे बंद ठेवावे. घराचे दरवाजे, खिडक्या, कुंपणा पासून दूर रहावे. मेघगर्जना झाल्यापासून 30 मिनिटे घराच्या आतच रहावे.

True-voter App : मतदार यादीवर ट्रू- व्होटर मोबाईल ॲपवर नाव शोधणे, हरकती दाखल करण्याची सुविधा

घराबाहेर असल्यास

घराबाहेर असल्यास त्वरित सुरक्षित निवाऱ्याच्या ठिकाणाकडे, मजबूत इमारतीकडे प्रस्थान करावे. ट्रॅकटर्स, शेतीची अवजारे, मोटरसायकल सायकल यांच्यापासून दूर रहावे. गाडी चालवत असल्यास, सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करा व गाडी सुरक्षित ठिकाणी लावताना मोठ्या झाडांपासून तसेच पुराचे पाणी येत असल्यास अशी ठिकाणे वगळून लावाव्यात. खुल्या ठिकाणांपेक्षा सामान्यतः खिडक्या बंद असलेल्या धातू पासून तयार झालेली वाहने, बस चांगली आश्रय स्थळे होऊ शकतात. उघड्यावर असल्यास शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपल डोके दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये झाकावे. मोकळ्या तसेच लटकत्या विद्युत तारांपासून दूर राहणे, जमीनीशी कमीत कमी संपर्क असावा, जंगलामध्ये दाट, लहान झाडांखाली उताराच्या जागेवर निवारा घ्यावा.

इतर खुल्या जागेवर: दरीसारख्या खोल जागेवर जाण्याचा प्रयत्न करा, परंतु अचानक येणाऱ्या पुरापासून सावध राहा. जर जमीनीच्यावर पाणी आल्यास ताबडतोब सुरक्षित निवारा शोधून काढा.

‘वीज पडल्यास / वज्राघात झाल्यास : त्वरीत रुग्णवाहिका व वैद्यकिय मदत बोलवा. वज्राघात बाधित व्यक्तिस त्वरित वैद्यकिय मदत मिळवून द्या. त्याला हात लावण्यास धोका नाही. ओल्या व थंड परीस्थितीत इजळाला (बाधित व्यक्ति) व जमिनीच्या मध्ये संरक्षणात्मक थर ठेवणे, जेणेकरून हायपोथरमीयाचा (hypothermiya / शरीराचे अति कमी तापमान) धोका कमी होईल.

खालील प्रमाणे इजा झालेल्या इसमास हाताळा

श्वसन बंद असल्यास :- तोंडावाटे पुनरुत्थान   (Mouth-to-Mouth) प्रक्रिया अवलंबावी,
हृदयाचे ठोके बंद असल्यास : कुठलीही वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाची हृदय गती CPR चा वापर करुन सुरु ठेवा.
इजाळाची/ रुग्णाचा श्वास व नाडी सुरु असल्यास:  इतर दुखापतीसाठी, आघातांसाठी तपासणी करणे.  (भाजणे/ऐकू न येणे/ न दिसणे)

वीज पडल्यास, वज्राघात झाल्यास  काय करू नये:-

गडगडाटीचे वादळ आल्यास, उंच जागांवर, टेकडीवर, मोकळ्या जागांवर, समुद्र किनारी, स्वतंत्र झाड, रेल्वे,बस, सहलीच्या आश्रय स्थाने इत्यादी ठिकाणी जाण्याचे टाळावे.  तसेच संदेश  दळणवळणाची टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, उघडी वाहने आणि पाण्याच्या ठिकाणी जाणे टाळावे.

घरात असल्यास काय करू नये :-  वायरद्वारे जोडले गेलले फोन, मोबाईल व इतर इलेक्ट्रीक व  इलेक्ट्रॉनिक उपकरणे विद्युत जोडणीस लावू नये, अशा आपत्कालीनवेळी कॉर्डलेस व वायरलेस फोनचा वापर करावा परंतु ते भिंतीला जोडलेले नसावे, गडगडीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करु नये, या दरम्यान आंघोळ करणे, हात धुणे, भांडी धुणे, कपडे धुणे, ही कार्य करु नयेत. कॉक्रीटच्या (टोस) जमिनीवर झोपू नये किंवा उभे राहू नये.  खिडक्यांची तावदाने, वायरींग व प्लंबींग,नळ  अशा प्रवाहकीय पृष्ठभागांशी संपर्क टाळावे.

घराबाहेर असल्यास काय करू नये:-

मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असतांना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये, वाहनांच्या धातू किंवा वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. अधांतरी लटकणा-या, लोंबणा-या  वायर (cables) पासून लांब रहावे. अशा सूचना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.