Chakan News : निर्दयी जगात मोरांना मिळाले दयावान!

100 मोरांना रोज धान्य व पाण्याची उपलब्धता

एमपीसी न्यूज –  कडकडीत उन्हाळ्याचा त्रास माणसांप्रमाणेच पशुपक्ष्यांनाही होत आहे. चाकण जवळील वाकी खुर्द भागात मागील अनेक वर्ष वास्तव्यास असलेल्या मोरांनाही उन्हाळ्यात अन्न व पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे येथील एका शेतकरी कुटुंबाने मोरांचे वास्तव्य असलेल्या भागात ठिकठिकाणी पाणी आणि धान्याची व्यवस्था केल्याने 100 पेक्षा अधिक मोरांनी स्थलांतर न करता याच भागात बस्तान बसवले आहे.

जंगलातील प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेऊ लागले आहेत. त्यामुळे मानव आणि प्राणी यांच्यात संघर्ष पहावयास मिळत आहे. मात्र वाकी खुर्द ( ता. खेड, जि.पुणे ) येथील दरा परिसरात जंगलांतील रानच्या पाखराला सुद्धा जीव लावला जात असल्याचे अत्यंत दिलासादायक चित्र पहावयास मिळत आहे.

वाकी खुर्द (ता. खेड) येथील परदेशी वस्ती (दरा) भागात दररोज सकाळी आणि सायंकाळी येणाऱ्या शंभरपेक्षा अधिक मोरांना येथील अजय परदेशी व त्यांच्या कुटुंबियांकडून शेताच्या लगतच्या भागात धान्य आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे या भागात शंभर पेक्षा अधिक मोरांचे वास्तव्य मागील काही वर्षांपासून असल्याची स्थिती समोर येत आहे.

Chakan News : असावे घरकुल अपुले छान!

यावेळी बोलताना अजय परदेशी यांनी सांगितले की, कडक उन्हाचा त्रास माणसांप्रमाणेच पशुपक्ष्यांनाही होतो. उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी, पुरेसे अन्न नसल्यास मोरांचा मृत्यू होतो, किंवा मोर तात्काळ स्थलांतर करतात. त्यामुळे मोरांची अन्न पाण्यासाठी वणवण थांबावी यासाठी येथेच काही मित्र मंडळींच्या सहकार्याने त्यांच्या अन्न पाण्याची सोय केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.