Pimpri : ‘चेन मार्केटिंग’च्या जाळ्यात अडकलेली तरुणाई

एमपीसी न्यूज – चेन मार्केटिंग नावाचं नवीन वेड महाविद्यालयीन तरुण-तरुणींना लागलं आहे. कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन यांसारख्या सर्व शाखेतील विद्यार्थी इकडे वळत आहेत. चेन मार्केटिंगच्या या जाळ्यात आधी आपण फसायचं आणि नंतर इतरांना फसवून आपल्या फसवणुकीचं समाधान मानून घ्यायचं, असं काहीसं याचं स्वरूप आहे. चेन मार्केटिंगला ‘बिजनेस’ असं गोंडस नाव देखील देण्यात आलं आहे. चेन मार्केटिंगला कुणी नावं ठेवली की या तरुणांचं पित्त खवळतं एवढी या तथाकथित बिजनेसबाबत कट्टरता बाळगली जात आहे.

चेन मार्केटिंग वाल्यांचा दिवसच लालसेने सुरू होतो. आज किती आणि कोणत्या लोकांशी संपर्क करायचा. कालच्या यादीतले राहिलेली गिऱ्हाईके यांचा तपशील काढून फोन करण्याचा सपाटा सुरू होतो. आकर्षक, मोहक मृदू भाषा, बोलण्याची लयबद्धता, आत्मविश्वास याच्या जोरावर समोरच्या व्यक्तीला एकदा भेटण्यासाठी राजी केलं जातं. मग पहिल्या भेटीत कंपनी, कंपनीचे बिजनेस मॉडेल, कंपनीचा पसारा, प्रतिष्ठित मान्यवरांशी असलेला संपर्क आणि टीम वर्क कसे उत्तम निकाल देऊ शकते हे दाखवले जातो. कंपनीच्या काही सदस्यांनी मिळवलेले मोठ्या रकमेचे धनादेश मोठ्या स्क्रिनवर दाखवले जातात. चेन मार्केटमध्ये येणाऱ्या नवख्या सदस्याला तेवढी रक्कम प्रेझेंटेशनशिवाय नंतर कुठेच बघायला मिळत नाही. कायम तो भ्रमनिरास झाल्यासारखा राहतो. पण आपला भ्रमनिरास झाल्याचे उट्टे तो इतरांना फसवून घेतो.

चेन मार्केटमध्ये एकजण अडकल्यास त्याचे पैसे वसूल करण्यासाठी तो दोघांना त्याच्या जाळ्यात ओढतो. ते दोघे अन्य चौघांना, चौघे अन्य आठ जणांना, ते आठजण सोळा जणांना अशा पद्धतीने पिरॅमिडप्रमाणे हे फसवणुकीचे जाळे वाढत जाते. चेन मार्केटमध्ये 99.99 टक्के लोकांचे पैसे बुडलेच आहेत. त्यामुळे युनायटेड स्टेटस, ग्रेट ब्रिटन, फ्रांस, कॅनडा, मलेशिया, नॉर्वे, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, नेपाळ, श्रीलंका आणि इराण यांसारख्या अनेक देशांमध्ये चेन मार्केटींगवर बंदी आहे.

पिंपरी चिंचवड, पुणे आणि इतर सर्वच शहरात चेन मार्केटिंगच्या टोळ्या तयार होत आहेत. अनेक कंपन्यांनी या तथाकथित बिजनेस मॅन-वुमनचे ड्रेस कोड तयार केले आहेत. कोणत्या दिवशी कोणता रंग, बूट कोणता असावा, मुलींचे सँडल उंच टाचांचे असावेत. असं स्पष्टपणे सांगण्यात येतं. मग हे बिजनेस मॅन-वुमन ऑफिसला गेल्याप्रमाणे कुठेतरी ठराविक ठिकाणी सुटाबुटात जातात. फसवणुकीच्या अपॉइंटमेंट घेतात. आठवड्यातून ठराविक दिवशी सेमिनार आयोजित करतात. त्यात उपस्थित लोकांचे ब्रेन वॉश केले जाते. कमी कालावधीत व्यवसाय, पैसे, श्रीमंती याचं खूळ डोक्यात भरलं जातं.

मनात लालसा, जिज्ञासा निर्माण केली जाते. पण नेमका काय प्रकार आहे, हे फोनवर सांगितले जात नाही. फोनवरून व्यवहार करणं पूर्णतः टाळलं जातं. एकदा भेट झाली की असं रंगवून सांगितलं जातं की, या व्यवसायाशिवाय अधिक फायदेशीर आणि चांगला जगात दुसरा कोणताच व्यवसाय नाही. लोकांना सहजासहजी फसवणे सोपे नाही.

पहिल्या भेटीत लोक कंपनी जॉईन करण्यास असमर्थता दर्शवतात. तसेच काहींच्या मनात द्वंद्व निर्माण होते. मनाची ही अवस्था हे शिकारी ओळखतात आणि अनेक मेंबर त्या शिकारीवर तुटून पडतात. एखाद्या चित्रपटाचे कथानक देखील फिके पडेल एवढं चांगलं आणि आनंदी दृश्य निर्माण केलं जातं. हा त्यांचा शेवटचा आणि अवघड टास्क असतो. अपवाद वगळता द्वंद्व सुरू असलेल्या व्यक्तीला आपल्या जाळ्यात ओढण्यात हे शिकारी विजयी होतात.

गिऱ्हाईक जाळ्यात अडकले की त्याच्याकडून पैसे उकळून सो कोल्ड कंपनीत जॉईन करून घेतलं जातं. हे चेन मार्केटिंग नाही तर ‘बिजनेस’ आहे, असं त्याला निक्षून सांगतात. पाहिले एक दोन महिने कंपनीची माहिती न देता हा बिजनेस आहे आणि तो कसा करायचा हे समजावले जाते. एकदा तो त्यात पारंगत झाला की, त्याची स्वतःची शिकार शोधण्यासाठी सोडलं जातं. तो देखील आपल्या भोळ्या-भाबड्या मित्रांचा शोध घेतो. तो करत असलेला बिजनेस किती चांगला आणि पैसे मिळवून देणारा आहे याचे वरवरचे वर्णन करतो. काम काय करायचे आहे हे सांगण्याव्यतिरिक्त तो त्याला सगळ्या गोष्टी रंगवून सांगतो. बिजनेस काय आहे? असे विचारल्यानंतर त्याला भेटायला बोलावून प्रेझेंटेशन देऊन आपल्या जाळ्यात ओढतो.

जॉईन करणाऱ्याकडे पैसे नसतील तर त्याचेही उत्तर यांच्याकडे तयार असतेच. फक्त 8 हजारांचा प्रश्न आहे. हा बिजनेस सुरू करताना मला सुद्धा सेम प्रॉब्लेम होता. माझ्याकडे तर फक्त चार हजारच होते. मग मी दोन हजार एका मित्राकडून घेतले. उरलेले दोन हजार दुसऱ्या मित्राच्या क्रेडिट कार्डवर लोन काढून घेतले आणि असे एकूण आठ हजार भरले. त्यावेळी ती अडचण सोडवली म्हणून आज मी एवढ्या मोठ्या पदावर पोहोचू शकलो. तू माझा चांगला मित्र आहे. मला तुला गमवायचं नाही. माझ्यासारखा तू सुद्धा बिजनेस करून मोठा व्हावा अशी माझी इच्छा आहे. अशी भंपक देखील केली जाते.

या जाळ्यात अडकलेले तरुण पुन्हा एखादी स्पर्धा परीक्षा देण्यास देखील तयार होत नाहीत. केवळ लोभसपणे बोलायचं आणि फसवणूक करायची एवढंच आयुष्याचं ध्येय बनतं. पोलिसांकडून अशा अनेक कंपन्यांची तपासणी केली जाते. अनेक सेमिनारवर छापे मारले जातात. मग कुठल्याही ध्येयाशिवाय निघालेले हे बिजनेस मॅन तुरुंगात जातात. चेन मार्केटिंग करून पुरेसे पैसे मिळतात हा एक केवळ भ्रम आहे. लोक जागरूक होत आहेत. तरुणांनी याकडे डोळसपणे बघण्याची गरज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.