Pimpri: अण्णासाहेब मगर स्टेडीयम भुईसपाट होणार; भंगार साहित्यापोटी महापालिकेला 82 लाख मिळणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेची अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलाची इमारत धोकादायक झाली असून ती पाडण्यात येणार आहे. ही इमारत पाडणा-या ठेकेदाराला इमारतीतून प्राप्त होणारे लोखंड, पत्रे, लाकूड, विद्युत वायरींग असे विविध प्रकारचे साहित्य देण्यात येणार आहे. त्यापोटी ठेकेदाराकडून महापालिकेला 82 लाख रूपये मिळणार आहेत.

कामगार कल्याण मंडळ आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 1775 साली नेहरूनगर येथे 28 एकर जागेत अण्णासाहेब मगर क्रीडा संकुल उभारण्यात आले होते. पाच हजार आसन क्षमता असलेल्या या क्रीडा संकुलाची इमारत 44 वर्षे जुनी झाली आहे. या मैदानावर विविध शालेय, व्यावसायिक स्पर्धा झाल्या आहेत. यातून कोट्यावधीचा निधी महापालिकेला प्राप्त झाला आहे. मात्र, या निधीतून वेळोवेळी क्रीडा या संकुलाची देखभाल करण्यात आली नाही. त्यामुळे या संकुलाची रया गेली आहे.

या क्रीडा संकुलात सध्या क्रीडा ग्रंथालय, निवडणूक विभाग कार्यालय, मैदान बुकींग कार्यालय आहे. मोडकळीस आलेल्या या इमारतीमुळे या कार्यालयांनाही धोक निर्माण झाला आहे. महापालिका अतिक्रमण विभागाने विविध कारवाईत जप्त केलेले साहित्य या संकुलाच्या प्रवेशद्वारातच अस्ताव्यस्त टाकलेले आहे. त्यामुळे हे संकुल खेळाचे मैदान आहे की भंगार गोदाम आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

बांधकामाची अवस्था दयनीय झाली असून भिंतींना चिरा पडल्या आहेत. प्लास्टर निघालेले आहे. लोखंडी गज स्पष्टपणे दिसून येतात. सुरक्षेसाठी उभारलेले लोखंडी कठडे कमकुवत झाले आहेत. छतावरील पत्रे तुटलेल्या अवस्थेत आहेत. मैदानावर भटकया (श्वान)कुत्र्यांचा वावर वाढला आहे. सायंकाळी सरावासाठी आलेल्या खेळाडूंच्या मागे ही कुत्री धावतात. कधी अंगावर धावत भुंकतात. मात्र, त्यांचाही बंदोबस्त केला जात नाही.

स्ट्रक्चरल ऑडीटच्या अहवालानुसार ही इमारत धोकादायक स्थितीत आहे. या संकुलात क्रीडाविषयक सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे क्रीडा संकुलातील जलतरण तलाव वगळता ही इमारत पाडून संपूर्णपणे पाडण्यात येणार आहे. त्यानंतर ‘पीपीपी’ तत्वावर पुन्हा नवीन अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. ही इमारत पाडणा-या ठेकेदाराला इमारतीतून प्राप्त होणारा राडारोडा, स्ट्रक्चरल स्टील, लोखंड, दरवाजा, खिडक्या, काँक्रीट, वीटा, फरशी, लोखंडी ग्रील, रेलींग, पत्रे, लाकुड, विद्युत वायरींग, बटणे आणि इतर न काढता येणारे साहित्य देण्यात येणार आहे.

त्याचा मोबदला म्हणून ठेकेदाराकडून रक्कम घेण्यात येणार आहे. त्यानुसार, क्रीडा संकुलाची इमारत पाडण्यासाठी महापालिकेमार्फत ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. एकूण दहा ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी ए टु झेड स्क्रॅपस या ठेकेदाराने सर्व करासंहित जास्तीत जास्त रक्कम म्हणजे 81 लाख 92 हजार रूपये रक्कम महापालिकेस देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार, ए टु झेड स्क्रॅपस यांच्याकडून 69 लाख 42 हजार रूपये अधिक 18 टक्के जीएसटी 12 लाख 49 हजार रूपये अशी एकूण 81 लाख 92 हजार रूपये महापालिका कोषागरात भरण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.