Pimpri: शहर अभियंता बढतीत मोठा गैरव्यवहार; राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सह शहर अभियंता राजन पाटील यांना शहर अभियंतापदी बढती देण्याची उपसूचना विसंगत आहे. महापौर, सभागृह नेत्याने दादागिरी करत विसंगत उपसूचना रेटून नेली आहे. यामध्ये महापौर, सभागृह नेत्याचा स्वार्थ दडला असून त्यात मोठा गैरव्यहार झाल्याचा सनसनाटी आरोप माजी महापौर, ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल, ज्येष्ठ नगरसेविका मंगला कदम यांनी आज (गुरुवारी) केला. तसेच भ्रष्टाचाराने बरबटलेले सत्ताधारी सभाशास्त्राला तिलांजली देत सभाकामकाज चालवित आहेत. सभाशास्त्राचे नियम पाळायचे नसतील तर अधिका-यांना घरी बोलवूनच भाजपने सभा कामकाज करावे, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

पत्रकारांशी बोलताना योगेश बहल म्हणाले, सभा शाखेप्रमाणे, लोकशाहिच्या अनुषंगाने सभाकामकाज चालविले जात नाही. बहुमताच्या जोरावार चुकीच्या पद्धतीने महासभा चालविली जाते. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या सत्ताधा-यांचा प्रत्येक विषयात स्वार्थ दडला असतो. प्रत्येक कामात त्यांना भ्रष्टाचार करायचा असतो. अगोदरच चुकीचे विषय रेटून नेण्याचे ठरविले जाते. कोण विषय वाचणार?, कोण अनुमोदन देणार? हे अगोदरच ठरवून त्याची यादी महापौरांना दिली जाते. नगरसचिव सत्ताधा-यांच्या दडपणाखाली काम करतात. माझी सातवी टर्म असून माझ्यासारख्या ज्येष्ठ नगरसेवकाला देखील बोलून दिले जात नाही, ही शोकांतिका आहे.

  • भाजपला सभाशास्त्राचे नियम पाळायाचे नसतील तर आयुक्त, नगरसचिवासह सर्व अधिका-यांना घरी बोलवावे. घरीच सभांचे कामकाज करुन घ्या. यापुढे भाजप सभाशास्त्राचे नियम पाळणार नसेल. तर, आम्ही सभागृहात उपस्थित राहणार नाही, असेही बहल म्हणाले.

भाजपच्या पहिल्या स्थायी समिती अध्यक्षांनी अखेरच्या सभेत घाई-घाईने कच-याच्या निविदेला मंजुरी दिली. त्यानंतर भाजपच्याच दुस-या स्थायी समिती अध्यक्षांनी कच-याची निविदा रद्द, मंजुरीचा घोळ घातला. ‘रिंग’ करण्यासाठीच हा घोळ घातला होता. त्यामुळे नाईलाजाने स्थायी समितीला कोट्यवधी रुपये देऊनही ठेकेदाराने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयाने महापालिकेवर ताशेरे ओढत ‘जैसे थे’ निविदा मंजूर करण्याचा आदेश दिला. भाजपच्या भ्रष्टाचारामुळेच शहरात कच-याचे साम्राज्य निर्माण झाल्याचा आरोपही बहल यांनी केला.

  • मंगला कदम म्हणाल्या, सह शहर अभियंता राजन पाटील यांना शहर अभियंतापदी बढती देण्याची उपसूचना सुसंगत आहे का? याचा खुलासा करण्याची आम्ही विनंती केली होती. परंतु, सत्ताधा-यांनी खुलासा करुन दिला नाही. यामध्ये मोठा गैरव्यहार झाला आहे. बढतीचा विषय रितसर विधी समितीमार्फत येणे अपेक्षित होते.

भाजपचे बहुमत आहे. त्यामुळे त्यांना जे करायचे आहे, ते रितसर, नियमाला धरुन करावे एवढीच आमची अपेक्षा आहे. तथापि, कोणतेही चुकीचे विषय आणतात आणि रेटून नेतात, हा सत्तेचा माज आहे. आमची सत्ता असताना जो नगरसेवक खुलासा मागत होता. त्यावेळी आम्ही खुलासा करण्यास सांगत होतो. पण, भाजप अधिका-यांना खुलासा करुन न देता त्यांची पाठराखण करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.