Pimpri : कार्यालय तोडफोड प्रकरणात पोलिसांचा मोठा आर्थिक व्यवहार; दत्ता साने यांचा आरोप

एमपीसी न्यूज – “कार्यालय तोडफोड प्रकरणात पोलिसांनी ज्या आरोपींना अटक केली आहे, त्यांच्यामागे मुख्य सूत्रधार भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि पांडुरंग बाळासाहेब साने हे आहेत. या प्रकरणात पोलिसांसोबत मोठा आर्थिक व्यवहार झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आहे”, असा गंभीर आरोप माजी विरोधी पक्ष नेता दत्ता साने यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

दत्ता साने यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “7 जून 2019 रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास सहा ते सात हल्लेखोरांनी साने चौक, चिखली येथील संपर्क कार्यालयावर हल्ला केला. हल्लेखोरांनी कार्यालयात तोडफोड करून दहशत निर्माण केली. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी काही आरोपींना अटक केली. त्यानंतर मुख्य आरोपी वगळता अन्य सर्व आरोपी जामिनावर सुटले आहेत. हा हल्ला राजकीय सूडापोटी झाला असून पोलिसांनी तपासामध्ये या प्रकरणाला वेगळे वळण दिले आहे.”

“तत्कालीन पोलिस आयुक्त आर के पद्मनाभन यांच्याकडे या प्रकरणातील पुरावे आपण सादर केले असून या हल्ल्यातील मुख्य सूत्रधार आमदार महेश लांडगे आणि पांडुरंग बाळासाहेब साने हे असल्याचे समोर येत आहे. पांडुरंग साने यांनी माझ्या हत्येची सुपारी रावण टोळीतील दिनेश रेणवा याला दिली. दिनेश रेणवा हा पांडुरंग साने यांचा जवळचा मित्र आहे. याचेही पुरावे पोलीस आयुक्तांकडे दिल्याचे साने म्हणाले.

दत्ता साने म्हणाले, “विरोधी पक्षनेता असताना आमदार महेश लांडगे यांची अनेक प्रकरणे उजडात आणली होती. तसेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी भोसरी विधानसभा मतदारसंघातून मी इच्छुक होतो. त्यामुळे माझी राजकीय कारकीर्द संपवण्याच्या हेतूने हा प्रकार झाला आहे. या प्रकरणात तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत पोलिसांवर दबाव आणून तपासाची दिशा बदलण्यात आली आहे. तसेच प्रकरणात पोलिसांसोबत मोठा आर्थिक व्यवहार झाला आहे.”

मुख्य सूत्रधारांवर तात्काळ कारवाई करावी. सर्व आरोपींची नार्को टेस्ट करण्यात यावी. हा तपास पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून सीबीआयकडे द्यावा. या मागण्यांसाठी दत्ता साने सोमवारी (2 मार्च) पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.