Pimpri: अधिका-यांना कोंडूनही आयुक्तांकडून भाजप नगरसेविकेला वाचविण्याचा प्रयत्न?

पाणीपुरवठा अधिकारी त्रस्त, बदलीची मागणी; पीएमओ, सीएकडे तक्रार

एमपीसी न्यूज – पाणीपुरवठा विभागातील अधिका-यांना सातत्याने लोकप्रतिनिधींकडून त्रास दिला जातो. अपमानित केले जाते. सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेने तर चक्क सहशहर अभियंता, कार्यकारी अभियंत्याना दोन तास कोंडून ठेवले. त्यामुळे त्रस्त झालेल्या अधिका-यांनी विभागातून बदलीची मागणी केली आहे. याबाबत पीएमओ, सीएमकडे तक्रार केली आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने आंदोलन केल्यास तत्काळ पोलिसात तक्रार दाखल करण्यास सांगणारे आयुक्त श्रावण हर्डीकर आता मात्र, शांत बसले आहेत. सहशहर अभियंत्याला कोंडून देखील भाजप नगरसेविकेविरोधात कोणतीही तक्रार नाही. त्यामुळे आयुक्तांच्या बोटचेपी आणि भाजपधार्जिणी भूमिकेमुळे अधिका-यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका आशा शेंडगे यांनी शनिवारी (दि.1) रोजी पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांच्यासह उपअभियंता, कनिष्ठ अभियंत्याला कासारवाडीतील पाण्याच्या टाकीखालील खोलीत कोंडून ठेवले होते. वरिष्ठ अधिका-यांना दोन तास कोंडून ठेवल्यामुळे अधिकारी वर्गामध्ये प्रचंड नाराजी आहे. अधिका-यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे याबाबतची तक्रारी केली आहे.

तसेच कर्मचारी महासंघाने देखील नगरसेविकेवर कारवाईची मागणी केली आहे. तर, नगरसेवकांच्या जाचामुळे कंटाळलेल्या पाणीपुरवठा विभागातील अधिका-यांनी हा विभागच नको अशी भुमिका घेतली आहे. या विभागातून बदलीची मागणी केली आहे. तसेच अशा घटनांमध्ये प्रशासनाचे प्रमुख असलेले आयुक्त श्रावण हर्डीकर पाठिशी उभे राहत नसल्याने अधिकारी वर्गामध्ये प्रचंड नाराजी आहे.

दरम्यान, यापूर्वी तत्कालीन विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागात आंदोलन केले होते. त्यावेळी तत्काळ आयुक्तांच्या सूचनेनुसार महापालिका सुरक्षा कर्मचा-यांच्या तक्रारीनुसार राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल केले होते.

आता भाजप नगरसेविका आशा शेंडगे यांनी तर सहशहर अभियंता, कार्यकारी अभियंत्यांना कोंडून ठेवले तरी ‘ना दाद, ना फिर्याद’ दिली आहे. भाजप नगरसेविका म्हटले की, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बोटचेपी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आयुक्तांच्या भूमिकेविषयी अधिका-यांमध्ये नाराजी आहे. याची तक्रार उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली जाणार आहे.

याबाबत बोलताना कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे म्हणाले, ”पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता, कार्यकारी अभियंत्यांना नगरसेविका आशा शेंडगे यांनी कोंडून ठेवले होते. याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. पाणीपुरवठा अधिकारी अडचणी सोडविण्यासाठी रात्रदिवस प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यांच्याकडून हलगर्जीपणा झाल्यास नियमानुसार विभागप्रमुखांना तक्रार करणे अपेक्षित होते. परंतु, असे काहीही न करता अधिका-यांना बेकायदेशीरपणे डांबून ठेवले आहे. ही बाब अतिशय निंदणीय आहे. याचा अधिकारी, कर्म-यांचे कामावरण परिणाम झाला असून भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी योग्य ती कायदेशी कारवाई करावी, अशी मागणी आम्ही आयुक्तांकडे केली आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.