Pimpri Chinchwad Ganeshotsav : औद्योगिक नगरी पिंपरी चिंचवडमध्ये पावसाच्या सरीत पर्यावरणपूरक गणपतींचे आगमन

एमपीसी न्यूज : औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad Ganeshotsav) आज लाडक्या गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मंडळे, सोसायटी व कार्यालयांमध्ये स्थापना करण्यात आली. गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनची निर्बंध होते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यावरही निर्बंध होते. त्यामुळे कमी उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. यावर्षी असे कोणतेही निर्बंध नसल्याने गणेश भक्त व गणेश मंडळे यांच्यामध्ये गणपती बाप्पाचे स्वागत करण्यासाठी प्रचंड उत्साह दिसून येत होता.

शहरातील सर्व भागात गणेश भक्तांच्या घरात सकाळपासून आनंदाचे वातावरण होते. शुभ मुहूर्ताच्या कालावधीत गणरायाची स्थापना व्हावी, यासाठी गणेश भक्त त्यांच्या कुटुंबियांबरोबर सकाळी बाजारात जाऊन बुकिंग केलेली मूर्ती घेत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. दुचाकी, तीन चाकी व कारमधून मूर्ती घरी घेऊन जात होते. तसेच काही गणपती मंडळाचे कार्यकर्ते देखील त्यांच्या मंडळासाठीची गणपती मूर्ती घेण्यास बाजारात आले असल्याचे पाहायला मिळत होते. पूर्ण शहरामध्ये ‘मोरया मोरया गणपती मोरया’चा जयघोष होता. शहरामध्ये संध्याकाळी चारच्या सुमारास विविध भागात हलका पाऊस झाला. त्यामुळे थोडा वेळ गणेश भक्त दुकानांमध्येच थांबून राहिले व त्यानंतर गणपती मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. तर, काही जोरदार पाऊस असतानाच मिरवणूक काढण्यात आली.

यावर्षी पर्यावरण पूरक गणेशोत्सव (Pimpri Chinchwad Ganeshotsav) साजरा करण्याकडे लोकांचा जास्त कल दिसून येत आहे. मोशी येथील प्रकाश जुकुंतवार (व्हाईस चेअरमन, रिव्हर रेसिडेन्सी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशन) म्हणाले की, “आमच्या फेडरेशनमधील सर्व सोसायटींमधील रहिवाशांसाठी शाडूच्या मातीपासून गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. त्यामध्ये 60-70 मुले व त्यांच्या पालकांनी सहभाग घेतला. कार्यशाळेत बनविलेल्या गणपती मूर्तीची स्थापना आज त्यांनी आपल्या घरी केली. माझ्या घरी देखील शाडू मातीपासून बनवलेल्या गणपती मूर्तीची स्थापना करण्यात आली.”

भोसरी येथील सामाजिक कार्यकर्ते देविदास गोफणे म्हणाले, की त्यांनी पर्यावरण पूरक गौरी गणपती सजावटीची कार्यशाळा घेतली होती. त्यामध्ये 60 ते 65 महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच, त्यांनी शाडूच्या मातीपासून गणपती बनवण्याचेही प्रशिक्षण देण्यात आले. माझ्या घरी शाडूच्या मातीपासून बनवलेल्या गणपती मूर्तीची आज स्थापना करण्यात आली. फुले व रांगोळी वापरून आम्ही सुंदर सजावट केली आहे.”

पिंपळे सौदागर येथील रोज लँड रेसिडेन्सीचे चेअरमन संतोष म्हसकर म्हणाले की, “माझ्या घरी शाडू मातीपासून बनवलेल्या गणपती मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. आम्ही सजावटीसाठी फुले वापरतो व ती फुले दर दोन दिवसानंतर बदलतो.”

प्रकाश जुकुंतवार (व्हाईस चेअरमन, रिव्हर रेसिडेन्सी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशन) म्हणाले की, “देहू आळंदी रोडवरील दीपक स्वीट्सपासून ते मंडपापर्यंत ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक करण्यात आली. स्थानिक रहिवासी नवनाथ भामे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या फेडरेशनमधील सोसायटींमध्ये राहणाऱ्या 25 जणांचे ढोल ताशा पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने मिरवणुकीत ढोल ताशा वादन केले. याही वर्षी नेहमीप्रमाणे आम्ही शाडू मातीपासून बनविलेल्या गणपती मूर्तीची स्थापना केली. पर्यावरण साहित्यापासून आम्ही यावर्षी देखावा तयार केला आहे. देखाव्यामध्ये आपल्याला एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेता येते. आमच्याकडे सात दिवसाचा गणपती असतो. दररोज संध्याकाळी आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घेणार आहोत.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.