Pimpri News : पिंपरी – चिंचवड पोलिसांचा विसर्जन काळात चोख बंदोबस्त

एमपीसी न्यूज – गणेशोत्सव व त्यानंतर विसर्जन यासाठी पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त केला आहे.मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे मदत म्हणून बाहेरून बंदोबस्त मागवण्यात येणार आहे.एक एसआरपीएफ प्लाटून, 20 पोलीस अधिकारी आणि 300 होमगार्ड अशी अधिकची कुमक शहर पोलिसांना मिळाली आहे.

सध्या आयुक्तालयात मनुष्यबळ ही मोठी अडचण आहे.त्यावर मात करत अधिक सक्षम पोलिसिंगसाठी सीसीटीव्ही, ड्रोन, सर्व्हेलन्स व्हॅन अशा तांत्रिक निगराणीचा आधार घेतला जाणार आहे.आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण एक हजार 742 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी परवानगी घेतली आहे.अनेक मंडळे परवानगी घेऊनही गणेशोत्सव साजरा करत नाहीत.तसेच काही मंडळे परवानगी न घेता गणेशोत्सव साजरा करतात.याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन आणि विविध कारवायांच्या माध्यमातून सुमारे दीड हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

रेकॉर्डवरील 800 गुन्हेगारांची पोलिसांकडून तपासणी

आयुक्तालयाच्या हद्दीतील रेकॉर्डवरील 800 गुन्हेगारांची पोलिसांनी तपासण करून त्यांची सर्व माहिती गोळा केली आहे.गणेशोत्सव तसेच पुढील काही महिन्यात महापालिका निवडणूक या अनुशंगाने ही कारवाई करण्यात आली आहे.

गुन्हेगाराचे पूर्ण व टोपण नाव, वय, शिक्षण, कामाच्या ठिकाणचे नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक, सध्याचा व मूळ गावचा पत्ता, एकूण दाखल गुन्हे, गुन्हेगाराची सवय, नातेवाईकाचे नाव, पत्ता, व्यवसाय आणि मोबाईल क्रमांक, गुन्हेगाराच्या साथीदाराचे नाव, वय, शिक्षण पत्ता आणि मोबाईल क्रमांक, साथीदारावर दाखल असलेले गुन्हे, गुन्हेगारांच्या आर्थिक उत्पन्नाचे साधन आणि त्याचा स्रोत यासह  अशी अनेक काही गोपनीय माहिती पोलिसांनी जमा केली आहे.

मागील काही दिवसात दीड हजार पेक्षा अधिक गुन्हेगारांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. चिंचवड, भोसरी, चाकण, तळवडे, तळेगाव परिसरात असलेल्या कंपन्यांमध्ये कंत्राटासाठी दादागिरी करणा-यांचीही माहिती पोलिसांनी काढली आहे. पोलीस आयुक्तांकडे 50 पेक्षा अधिक जणांची माहिती गोपनीयरित्या आली आहे. आयुक्तालय हद्दीत 60 गुन्हेगारी टोळ्या आहेत. त्यातील बाळू वाघेरे, राकेश भरणे, वाघ्या मारणे, रावण, विकी घोलप, सचिन सौदाई, संतोष खलसे, शाहरुख खान, साहिल जगताप, महेमूद कोरबू , महेश डोंगरे, पिंटू जाधव, अवधूत गाढवे, स्वप्नील शिंदे, मयूर उर्फ बंटी टकले, करण रोकडे या 16 टोळ्यांवर पोलिसांची करडी नजर ठेवली जाणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.