Pimpri: कंपन्यांनी कामगारांची ‘कोरोना चाचणी ‘ करावी – गजाजन बाबर

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण असून, कंपन्यांमध्ये मोठ्यासंख्येने कामगार संघटित असतात. एखाद्या कामगाराला कोरोना संसर्ग झाल्यास त्याच्या कुटुंबालाही संसर्ग होण्याचा धोका संभवू शकतो. त्यासाठी विशेष काळजी म्हणून जिल्हा प्रशासनाने कंपन्यातील सर्व कामगारांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश कंपन्यांनाच्या व्यवस्थापनाला द्यावेत, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विशेष मदत होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

याबाबत बाबर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना निवेदन दिले असून, त्यात म्हटले आहे की, कोरोना या विषाणूमुळे देशात घबराट निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात मॉल, आयटी सेक्टर कंपन्या, यात्रा, शाळा, महाविद्यालये बंद ठेवली आहेत. महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या 41 असून त्यापैकी 16 जण पुण्यामधील आहेत. पुणे जिल्ह्यात औद्योगिकरण जास्त आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रत्येक कंपनीमध्ये कामगारांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश द्यावेत. कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात लोक संघटित असतात. कोरोना संसर्गामुळे कामगाराच्या कुटुंबालाही संसर्ग होण्याचा धोका संभवू शकतो. त्यासाठी विशेष काळजी म्हणून जिल्हा प्रशासनाने कंपन्यातील सर्व कामगारांची कोरोना टेस्ट करण्याचे आदेश कंपन्यांच्या व्यवस्थापनाला द्यावेत.

तसेच कामगारांनी मास्क वापरावा, गर्दीची ठिकाणे टाळावीत, चेहर्‍याला हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत. ताप आणि खोकला असणाऱ्या रुग्णाचा सहवास टाळावा, असे आवाहनही बाबर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.