Pimpri Corona News: …म्हणून तर कोरोनाची रुग्णसंख्या वाढत नाही ना?

अॅन्टीजेन निगेटीव्ह पण 'आरटीपीसीआर'चा पॉझिटीव्ह रिपोर्ट आला तब्बल नऊ दिवसांनी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात कोरोना चाचणीचे रिपोर्ट येण्यास विलंब होत आहे. एका 39 वर्षीय पुरुषाचा अॅन्टीजेन चाचणीचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने ती व्यक्ती कामावरही गेला. पण, आरटीपीसीआर चाचणी पॉझिटीव्ह असल्याचा रिपोर्ट तब्बल नऊ दिवसांनी आला. या कालावधीत ते कामावरही गेले होते. महापालिकेच्या अशा नियोजनशून्य, ढिसाळ कारभारामुळेच तर कोरोनाचा प्रसार होत नाही ना, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात जानेवारीच्या सुरुवातीपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहे. तिस-या लाटेत झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. एका दिवसाची रुग्णसंख्या चार हजाराच्या पुढे गेली. पण, तिस-या लाटेला प्रशासनही गांभीर्याने घेत आहे की नाही असा प्रश्न उपस्थित करणारा ए प्रकार उघडकीस आला आहे.

महापालिकेच्या रुग्णालयात कोरोनाची चाचणी केली जाते. घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पिंपरीतील वायसीएम रुग्णालय आणि भोसरी रुग्णालयात पाठविले जातात. पण, तपासणीचा रिपोर्ट येण्यास तब्बल आठ ते नऊ दिवस लागत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

शहरातील एका 39 वर्षीय व्यक्तीने लक्षणे दिसू लागल्याने महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात कोरोनाची चाचणी केली. अॅन्टीजेन आणि आरटीपीसीआर अशा दोनही चाचण्या केल्या. त्यांचा अॅन्टीजेनचा रिपोर्ट निगेटीव्ह आला. त्यामुळे त्यांना घरी जाण्यास सांगितले. तर, आरटीपीसीआर चाचणीसाठी 11 जानेवारी रोजी त्यांचा घशातील द्रावाचे नमुने घेतले.

त्याची तपासणी पाच दिवसांनी म्हणजेच 16 जानेवारी रोजी केली. तर, आरटीपीसीआरचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने तीन दिवसांनी म्हणजेच 19 जानेवारी रोजी रुग्णाला कळविले. रिपोर्ट 16 जानेवारीला आला तर संबंधित रुग्णाला कळविण्यास तीन दिवस का लावले असा प्रश्न उपस्थित होत आहे. आरटीपीसीआरचा रिपोर्ट येईपर्यंत संबंधित व्यक्ती कंपनीतही कामाला गेली होती.

महापालिकेच्या गलथान कारभारामुळे ही व्यक्ती पॉझिटीव्ह असतानाही कामावर गेली. या 11 दिवसांच्या कालावधीत त्यांच्या संपर्कात किती लोक आले असतील? त्यांच्या संपर्कातील सर्वांनाच कोरोनाची लागण झाली. तर, त्याला जबाबदार कोण? असे विविध प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात. गलथान कारभारामुळेच रुग्णसंख्येत वाढ होत असून तिस-या लाटेला प्रशासन गंभीरपणे घेत नसल्याचा आरोप संबंधित पॉझिटीव्ह रुग्णाने केला. या रुग्णाचा पॉझिटीव्हचा रिपोर्ट ‘एमपीसी न्यूज’कडे आहे.

वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ. राजेंद्र वाबळे म्हणाले, ”वायसीएम आणि भोसरी रुग्णालयात आरटीपीसीआर चाचणी करण्याची लॅब आहे. मधल्या काळात सॅम्पलचा लोढ वाढला होता. लक्षणे असलेल्या चाचण्याही वाढल्या होत्या. त्यामुळे बॅकलॉग राहत होता. भोसरीतील एक मशिन खराब झाले होते. त्यामुळे वायसीएममधील एक मशिन भोसरी रुग्णालयाला दिले होते. त्यामुळे वायसीएमवर लोढ वाढला. वायसीएममध्ये 700 ते 800 रिपोर्ट तपासण्याची क्षमता होती. सॅम्पल 1500 ते 2 हजार येत होते. त्यामुळे बॅकलॉग राहत होता. आता तशी परिस्थिती नाही”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.