Pimpri Corona News: दिलासादायक, कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या घटली

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात सद्यस्थितीत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनामुळे दिवसाला सरासरी 40 ते 50 रुग्णांचा मृत्यू होत होता. सद्यस्थितीत जुलै महिन्यात दिवसाला सरासरी 3 ते 5 रुग्णांचा मृत्यू होत आहे. परिणामी यातून नागरिकांना आणि आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.

नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत शहरातून कोरोना हद्दपार झाला, अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु फेब्रुवारीपासून शहरात रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली. त्यानंतर मार्च ते मे या कालावधीत शहरात दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत राहिली. परिणामी शहरात पुन्हा निर्बंध लावण्यात आले. मेच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्णसंख्या कमी होण्यास सुरुवात झाली. आता शहरातील कोरोनाची स्थितीही नियंत्रणात आहे. परंतु, पुढील काही महिन्यांत संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने महापलिका प्रशासन उपाययोजना करीत आहेत. शहरात एप्रिलमध्ये 70, 285 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. जूनमध्ये 7 हजार 389 रुग्णांची नोंद झाली आहे. यावरून एप्रिलच्या तुलनेत जूनमध्ये दहा पटीने कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याचे स्पष्ट होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.