Pimpri : ‘कोरोना’मुळे उद्योगनगरीत शुकशुकाट; बाजारपेठा, रस्ते पडले ओस

एमपीसी न्यूज – पिंपरी भागात ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढत आहे त्यामुळे उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड येथील नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतल्याचं दिसत आहे.मॉल्स, शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळे बंदचे आदेश असल्यामुळे नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले.एरवी वर्दळीचे असणारे रस्ते आज (मंगळवारी) ओस पडल्याचे दिसत होते. कंपनीत कामासाठी बाहेर पडलेले कर्मचारी सोडून रस्त्यावर फार कमी नागरिकांची ये – जा आढळून आली.

पुणे आणि पिंपरी चिंचवड सहित कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 17 वर जाऊन पोहचली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपायोजना म्हणून राज्यसरकार तसेच महानगपालिका युद्धपातळीवर काम करत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या खबरदारीसाठी व भीती पोटी लोक घराबाहेर पडत नाहीत. पिंपरी चिंचवडमधील पिंपरी, भोसरी, पिंपरी कॅम्प परिसर, चिंचवड व निगडी परिसरात कमालीची शांतता होती. लोक गरज असेल तरच बाहेर पडत आहेत.

शहरातील इलेकट्रोनिक दुकाने, कपड दुकाने, औषधालये, किराणा मालाची दुकाने वगळता बाकी सर्व दुकाने बंद होती. भाजी मार्केट मध्ये तुरळक लोकांची गर्दी सोडता इतरत्र गर्दी नव्हती. रेल्वे, बस तसेच पीएमपीएल बसेस मधून फार कमी लोक प्रवास करताना दिसून आले. शाळा, उद्याने, धार्मिक स्थळे बंद केल्याने या ठिकाणी सुद्धा शुकशुकाट होता. शहरातील प्रमुख चौक, खाद्य चौपाट्या, मॉल्स व गर्दीची ठिकाणी जाणे लोक कटाक्षाने टाळत आहेत.

फळविक्रेते, भाजीविक्रेते यांच्या मालाला ग्राहक येत नसल्याने तसाच पडून होता. नेहमी वाहतूक कोंडी होणारा बीआरटी टर्मिनल, प्रमुख चौकांचा परिसर अक्षरश: सुना सुना दिसत होता. विद्यार्थी, प्रवासी यांची संख्या रोडावल्याने बहुतांश बस रिकाम्या होत्या. जीवघेण्या कोरोना विषाणूने पिंपरी-चिंचवड शहरात शिरकाव केल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनोच्या भितीने नागरिकांचा बाहेरील वावर कमी झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.