Pimpri : घरटी दरमहा 60 रुपये कचरा शुल्कावरुन भाजप-राष्ट्रवादीत जुंपली

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत जुलै 2019 पासून घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी घरटी दरमहा 60 रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. राज्यातील सत्ता जाताच भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी हा प्रस्ताव रद्द करुन राज्य सरकारकडे पाठविण्याची सूचना महापौरांना केली. दरम्यान, राज्यात भाजपची सत्ता असताना कचरा शुल्क लागू केले. आता सत्ता गेल्यानंतर भाजपच्या लोकप्रतिनिधींना कचऱ्याचे 60 रुपये शुल्क रद्द करण्याची मागणी करावी लागते हे मोठी लाजिरवाणी बाब असल्याची टीका विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.

राज्यात भाजपची सत्ता असताना नगरविकास खात्याने महापालिकांना घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी), स्वच्छता व आरोग्य उपविधी लागू करण्याबाबतचा अध्यादेश 11 जुलै 2019 रोजी केला होता. याची अंमलबजावणी करण्यासाठी महासभेची स्वतंत्र मान्यता घेण्याची आवश्‍यकता नसल्याने पिंपरी महापालिकेने जुलै 2019 पासून प्रति घर दरमहा घरटी 60 रुपये शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आता राज्यातील भाजपची सत्ता गेली आहे. त्यानंतर महापालिकेतील सत्ताधा-यांनी हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली आहे.

घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत नागरिकांना आकारण्यात येणारे दरमहा 60 रुपये शुल्क रद्द करण्यात यावे. त्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करून तो राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशी सूचना भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापौर महापौर उषा ढोरे केली आहे.

त्यावर विरोधी पक्षनेते नाना काटे म्हणाले, “महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून जनतेच्या पैशाची दोन्ही हाताने लूट चालू आहे. आता राज्यातील सत्ता गेल्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या लोकप्रतिनिधींना कचऱ्यातील 60 रुपये शुल्क रद्द करण्याची मागणी करावी लागते हे मोठी लाजिरवाणी बाब आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.