Pimpri: भाजपच्या पक्षीय कार्यक्रमात महापालिका कर्मचाऱ्यांना जुंपले!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या पक्षीय कार्याक्रमासाठी महापालिकेतील जनता संपर्क विभाग आणि महापौर दालनातील कर्मचाऱ्यांना जुंपले होते. भाजपच्या कार्यक्रमात महापालिका कर्मचा-यांचा मोठ्या प्रमाणात वावर होता. कर्मचा-यांची चांगलीच चलती होती. पक्षाच्या खासगी कार्यक्रमात महापालिका कर्मचा-यांच्या उपस्थितीची जोरदार चर्चा रंगली होती. आता या कर्मचा-यांवर आयुक्त श्रावण हर्डीकर कारवाई करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

केंद्रीय मंत्रीमंडळात राज्यमंत्रीपदी वर्णी लागल्यानिमित्त रावसाहेब दानवे, पुण्याचे माजी पालकमंत्री गिरीश बापट खासदार म्हणून निवडून आल्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर भाजपतर्फे आज (सोमवारी) दोघांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर शहर भाजपच्या नवीन पक्ष कार्यालयाचे त्यांचे हस्ते ई-उद्‌घाटन करण्यात आले. पिंपरी, संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

  • हा संपूर्ण भाजपचा पक्षीय कार्यक्रम होता. या कार्यक्रमाचा महापालिकेशी कोणताही संबध नव्हता. तरी, देखील कार्यक्रमाच्या ठिकाणी महापालिकेच्या जनता संपर्क आणि महापौर दालनातील कर्मचा-यांचा मोठ्या प्रमाणात वावर होता. जनता संपर्क विभागाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे रजेवर आहेत. त्यामुळे ते कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यांच्या अनुउपस्थितीत जनता संपर्क विभागातील कर्मचा-यांनी भाजपच्या पक्षीय कार्यक्रमाला हजेरी लावणे पसंत केले.

त्यामध्ये वरिष्ठ लिपिकांपासून शिपायांचा समावेश होता. कर्मचारी भाजपच्या कार्यक्रमात गुंतल्याने जनता संपर्क विभाग ओस पडला होता. तर, महापौर दालनातील महापौरांचे स्वीय सहाय्यक, शिपाई हे देखील कार्यक्रम स्थळी उपस्थित होता. कार्यक्रमात त्यांची चलती होती.

  • एकीकडे आयुक्त श्रावण हर्डीकर हे कर्मचा-यांना शिस्त लावण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. शिस्तीचे आदेश काढले जात आहेत. त्याचा कर्मचा-यांवर कोणताही परिणाम होताना दिसून येत नाही. त्याउलट कर्मचारी आदेशाच्याच्या विरोधातच वागताना दिसतात. आता भाजपच्या पक्षीय कार्यक्रमाला जनता संपर्क, महापौर दालनातील कर्मचारी उपस्थित राहिल्याने त्यांच्यावर काय कारवाई होणार हे पाहणे म्हत्वाचे ठरणार आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी संपर्क असता. त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे प्रशासनाची बाजू समजू शकली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.