Pimpri News: भामा-आसखेड धरणाजवळ जलउपसा केंद्रासाठी जॅकवेल, सबस्टेशन बांधणार

भाड्यापोटी जलसंपदा विभागाला सव्वाकोटी देणार

एमपीसी न्यूज – भामा-आसखेड धरणाजवळ 1.20 हेक्टर जागेत 200 दशलक्षलिटर प्रतिदिनी क्षमतेच्या अशुद्ध जलउपसा केंद्रासाठी जॅकवेल, अ‍ॅप्रोच ब्रीज, सबस्टेशन बांधण्यात येणार आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाची 1.20 हेक्टर जागा भाडेपट्ट्याने घेण्यात येणार आहे. त्यापोटी पाच वर्षे कालावधीसाठी भाडेपट्ट्याचे 1 कोटी 20 लाख 16 हजार रूपये कार्यकारी अभियंता, चासकमान पाटबंधारे विभाग, पुणे यांना देण्यात येणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत शहराच्या चिखली, च-होली, वडमुखवाडी, दिघी आणि मोशी परिसरात पाणीपुरवठा होण्यासाठी नियोजित भामा-आसखेड प्रकल्प राबविण्याची प्रक्रीया सुरू आहे. शहराचा लोकसंख्यावाढीचा वेग आणि भविष्यातील सन 2045 पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन महापालिकेकडून राज्य सरकारला आंद्रा व भामा आसखेड धरणातून पाणी आरक्षित करण्यासाठी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार, सरकारने महापालिकेस घरगुती वापरासाठी भामा आसखेड धरणातून 60.79 दशलक्ष घनमीटर पाणी कोटा आरक्षणास 13 नोव्हेंबर 2018 रोजी मान्यता दिली आहे. त्या अनुषंगाने भामा आसखेड धरणाजवळ वाकी तर्फे वाडा येथील 1.20 हेक्टर जागेत 200 दशलक्षलिटर प्रतिदिनी क्षमतेच्या अशुद्ध जलउपसा केंद्रासाठी जॅकवेल, अ‍ॅप्रोच ब्रीज, सबस्टेशन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यासाठी जलसंपदा विभागाची जमीन भाड्यापट्ट्याने मिळण्यासाठी 16 ऑक्टोबर 2020 रोजी महापालिकेमार्फत प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार, चासकमान पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांचे 6 ऑक्टोबर 2021 रोजीचे पत्र महापालिकेस प्राप्त झाले आहे. जलसंपदा विभागाची 1.20 हेक्टर जमीन सन 2021-22 ते सन 2025-26 या पाच वर्षाच्या कालावधीसाठी घेण्याकरिता भाडेपट्ट्याचे एकूण 1 कोटी 20 लाख 16 हजार रूपये कार्यकारी अभियंता, चासकमान पाटबंधारे विभाग, पुणे यांच्या नावे धनादेशाद्वारे भरून करारनामा करून घ्यावा, असे पत्राद्वारे कळविले आहे.

महापालिकेच्या सन 2021-22 च्या मुळ अंदाजपत्रकातील ‘पाणीपुरवठा विशेष योजना निधी’ मधील भामा आसखेड धरण येथे जॅकवेल, पंपींग हाऊस, रायझिंग मेन व पाईपलाईन करणे या लेखाशिर्षावर जॅकवेल व पंपहाऊस बांधणे अंतर्गत दोन कोटी रूपये इतकी तरतुद आहे. ही रक्कम या कामातून खर्च करता येईल. त्यानुसार, अशुद्ध जलउपसा केंद्रासाठी जॅकवेल, अ‍ॅप्रोच ब्रीज, सबस्टेशन आदी बांधण्याकरिता पाच वर्षे कालावधीसाठी भाडेपट्ट्याचे 1 कोटी 20 लाख 16 हजार रूपये कार्यकारी अभियंता, चासकमान पाटबंधारे विभाग, पुणे यांना देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.