Pimpri News: जामीनावरील अ‍ॅड. नितीन लांडगे यांनी घेतली ‘स्थायी’ची सभा; राष्ट्रवादी, शिवसेनेचा अघोषित बहिष्कार

एमपीसी न्यूज – लाच प्रकरणात जामीनावर सुटल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे यांनी आज (बुधवारी) महापालिका मुख्यालयात हजेरी लावत समितीची सभा घेतली.

मागील आठवड्यातील आणि आजच्या अशा दोनही सभा काही मिनिटांत संपविल्या. सुमारे 40 कोटी रुपयांहून अधिक विकासकामांना मान्यता दिली. सभेत केवळ सत्ताधारी भाजपचे सदस्य सहभागी झाले होते. विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार, शिवसेनेच्या एका सदस्याने सभेवर अघोषित बहिष्कार घातला. दरम्यान, आंदोलन होण्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

वर्क ऑर्डर मिळविण्यासाठीच्या करारनाम्यावर सही करण्यासाठीचे 1 लाख 18 हजार रुपयांची लाच स्वीकारताना स्थायीच्या कर्मचाऱ्यांना एसीबीने बुधवारी (दि.18) महापालिका मुख्यालयात रंगेहाथ पकडले होते. स्थायीची सभा संपताच समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे यांच्यासह पाच जणांना अटक केली होती. त्यांना दोनवेळा पोलीस तर एकवेळा न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मागील बुधवारी (दि.25) राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने जोरदार आंदोलन केले. त्यावेळी तात्पुरत्या जामीनावर असलेले अध्यक्ष अ‍ॅ ड. नितीन लांडगे यांनी ऑनलाइन सभेसाठी महापालिकेत येणे टाळले. एकाच सदस्याने मागील सभा तहकूब केली होती. त्यानंतर अध्यक्षांची पुन्हा न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. अ‍ॅ

न्यायालयाने सोमवारी (दि.30) महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी चौकशीसाठी हजर रहावे, या गुन्ह्याशी संबंधित असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये अशा अटी-शर्तीवर अध्यक्षांसह पाच जणांना जामीन मंजूर केला. त्यानंतर आज (बुधवारी) स्थायी समितीची साप्ताहिक सभा होती. सभेच्या विषयपत्रावर कोट्यवधी रुपयांचे 29 विषय मान्यतेसाठी होते. जामीनावर असलेले अध्यक्ष अ‍ॅड. लांडगे सभेला येणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

लांडगे यांनी सभेला हजेरी लावली. दुपारी ते महापालिका मुख्यालयात आले. चौथ्यामजल्यावरील ‘कॉन्फरन्स’ रुममधून त्यांनी ऑनलाइन सभा घेतली. मागील आठवड्यातील तहकूब आणि आजची दोनही सभा घेतल्या. मागच्या सभेतील एक विषय तहकूब केला. मागच्या सभेच्या विषयपत्रावरील उर्वरित आणि आजच्या सभेच्या विषयपत्रिकेवरील कोट्यवधी रुपयांच्या सर्व विषयांना मान्यता दिली. सभेत केवळ सत्ताधारी भाजपचे नगरसेवक ऑनलाइन सहभागी झाले होते. विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या सदस्यांनी सभेवर अघोषित बहिस्कार घातला.

ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्तांवर झालेल्या हल्ल्याचा बैठकीत निषेध करण्यात आला. तसेच अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे यांनी अशा प्रकारची घटना पिंपरी चिंचवड शहरामध्ये घडू नये याकरिता आयुक्तांना सूचना दिल्या. अतिक्रमण कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढावे याकरीता पुरेसा बंदोबस्त त्यांना पुरविण्यात यावा, असेही लांडगे म्हणाले. तसेच गणेशोत्सव काळामध्ये विसर्जनासाठी नागरिकांच्या सोयीसाठी वाहनांवर विसर्जनाची सोय उपलब्ध करुन द्यावी यासाठी लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून आवश्यकतेनुसार 50 पेक्षा जास्त वाहने ठेवावीत अशा सूचनाही अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे यांनी आयुक्तांना केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.