Pimpri News: नियमांप्रमाणे मागणी करुनही भाजपने सर्वसाधारण सभा घेतली नाही; आता सामान्य जनतेची शनिवारी अभिरुप ‘महासभा’

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेसच्या नेत्यांची माहिती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने 18 फेब्रुवारीची शेवटीची महासभा नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर म्हणजेच 17 मार्चपर्यंत तहकूब केली. 13 मार्च रोजी नगरसेवकांचा कार्यकाळ संपणार असल्याने 17 मार्च रोजीची सभा होऊ शकणार नव्हती. त्यामुळे नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न, गेल्या पाच वर्षातील विकासकामांसह भ्रष्टाराच्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी आम्ही नियमांप्रमाणे विशेष महासभेचे आयोजन करण्याची मागणी केली. परंतु, भाजपने ती फेटाळत भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन पळ काढला. त्यामुळे विविध विकास कामांमधील भ्रष्टाचारावर चर्चा करण्यासाठी येत्या शनिवारी (दि.12) सामान्य जनतेची अभिरुप महासभा घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेसच्या नेत्यांनी आज (गुरुवारी) पत्रकार परिषदेत सांगितले.

विरोधकांनी सभेचे विषयपत्रही काढले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील मार्च महिन्याची मासिक सभा  पिंपरीतील आचार्य अत्रे सभागृहात शनिवारी (दि.12) दुपारी बारा वाजता आयोजित केली असून विषयपत्रिकेवर 9 विषय ठेवले आहेत. त्यात स्मार्ट सिटी, निविदेतील रिंग, कुत्र्यांच्या नंसबदीतील भ्रष्टाचार, संतपीठ, कचरा संकलन, अनधिकृत होर्डिंग्ज, डॉक्टर भरती, अर्बन स्ट्रीट, खरेदी अशा 9 कामातील भ्रष्टाचाराची माहिती जनतेला दिली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष, नगरसेवक अजित गव्हाणे, शिवसेनेचे शहरप्रमुख, नगरसेवक सचिन भोसले, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, संजोग वाघेरे, नगरसेवक राहुल भोसले, विनोद नढे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे,  राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, काँग्रेसच्या सायली नढे आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, ”सत्ताधारी भाजपने भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर चर्चा होऊ नये यासाठी फेब्रुवारी महिन्याची शेवटची महासभा नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर म्हणजेच 17 मार्चपर्यंत तहकूब केली.  चर्चेपासून पळ काढला. त्यामुळे महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार राष्ट्रवादीच्या चार स्थायी समितीच्या सदस्यांनी विशेष महासभेचे आयोजन करण्याची विनंती महापौरांकडे केली होते. परंतु, महापौरांनी विनंती मान्य केली नाही. उलट विरोधक उद्या शनिवारवाडा मागतील असे बोलून लोकप्रतिनधींचा अपमान केला. लोकप्रतिनीधी म्हणून आमची जनतेशी बांधिलकी आहे. त्यामुळे महापालिकेतील असंख्य भ्रष्टाचाराच्या प्रकरणांबद्दल चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या अभिरुप महासभेला शहरातील नागरिकांनी उपस्थित रहावे” असे आवाहनही गव्हाणे यांनी केले.

अभिरुप महासभेसमोरील विषय
विषय क्रमांक 1) – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीत सल्लागार, ठेकेदार, काही राजकीय नेत्यांच्या अभद्र युतीने करदात्यांच्या कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. अब्जावधी कामांना तांत्रिक मान्यता न घेता केंद्र, राज्य सरकार, महापालिकेची फसवणूक केली. राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते नातेवाईकच ठेकेदार बनून काम करतात. अथवा त्यांनी तिस-याला सब कॉन्ट्रॅक्ट दिले. रस्ते खोदाई, अनावश्यक सिमेंटचे रस्ते, सुशोभीकरण, सीसीटीव्ही बसविणे, ई लर्निंग, शेअर अ बायसिकल, सल्लागार संस्था नियुक्तीत भ्रष्टाचार झाला. स्मार्ट सिटी प्रकल्पात 500 ते 700 कोटींचा घोटाळा झाला आहे. याबाबतचे तपशीलवार विवेचन करदात्या जनतेच्या सभेपुढे मांडण्यात येणार आहे.

विषय क्रमांक 2 – कुत्र्यांच्या नसबंदीतही पैसे खाल्ले आहेत. लॉकडाऊन काळात 7 हजार 121 कुत्र्यांची नसबंदी केल्याचे भासवून चार ठेकेदार संस्थांना तब्बल 73 लाख रुपये दिले. पुराव्यासाठी नसबंदीकरण करतानाचे छायाचित्र न जोडता बोगस बिलाच्या आधारे बिले दिली. शहर भाजपचा सरचिटणीसाचा कुत्र्याच्या नसबंदीच्या निविदेत गुंतला असल्याचे वृत्त आले आहे. त्याचाही तपशील नागरिकांसमोर मांडला जाणार आहे.

विषय क्रमांक 3 – महापालिकेच्या विविध विकास कामांच्या निविदा रिंग करुन भरल्या जातात. निविदेच्या अटी-शर्ती ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेऊन तयार केल्या जातात. रिंग करुन निविदा भरल्याने कोट्यवधी रुपयांची लूट केली. भाजप नेते, भाजपच्या नगरसेवकांनी पोट ठेकेदारी केल्याने कामाची गुणवत्ता खालावली. बोगस कागदपत्रे, एफडीआर देऊन पालिकेची फसवणूक केली. रिंग करुन कोट्यवधी रुपयांच्या झालेल्या भ्रष्टाचाराचा तपशील जनतेसमोर मांडणार आहे.

विषय क्रमांक 4 – चिखलीतील संतपीठाच्या मूळ हेतुलाच हरताळ फासला असून वारकरी सांप्रदायाची मोठी फसवणूक केली. संत पिठाचे 40 कोंटीचे काम भाजपने ठेकेदारांना रिंग करायला लावून 45 कोटी रुपयांवर नेले. संतपीठ हे तमाम भागवत धर्मियांच्या आस्थेचा विषय, पण त्यातही सत्ताधारी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. या पवित्र कामासाठी वारकरी सांप्रदयात सर्वोच्य स्थान असलेल्या नामांकित लोकांचे नाव, अनुभव, प्रतिष्ठेचा फक्त वापर केला. आता त्यांना बाजूला केल्याने वारक-यांच्या भावनेला ठेच पोचवून कार्यकर्त्यांची सोय लावली. वारकरी सांप्रादयाची झालेली फसवणूक करदात्या जनतेपुढे मांडली जाणार आहे.

विषय क्रमांक 5 – कचरा संकलन, प्रक्रिया, रस्ते साफसफाई व यांत्रिकी पद्धतीने साफसफाई या कामातील भ्रष्टाचार, ठेकेदारांकडून गोरगरीब कामगारांचे पगार हडप केले जातात. कामगारांचे एटीएम ताब्यात घेऊन पैसे चोरले जातात. कच-याच्या गाडीत दगड भरुन वजन वाढविले जाते. त्यातून करदात्यांच्या पैशांची लूट चालू असून त्याची माहिती देणार आहेत.

विषय क्रमांक 6 – शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज काढण्यासाठी दीड कोटी रुपयांचे टेंडर काढले पण होर्डिंग्ज न काढता विद्युत खांबावरील किऑस्क काढले. ठेकेदाराला बील अदा केले. हा प्रकार लेखापरिक्षण विभागाने केलेल्या ऑडीटमध्ये उघडकीस आला. या भ्रष्टाचारात भाजपचा एक सरचिटणीस सहभागी असल्याने हे प्रकरण दाबण्यात येत आहे. या भ्रष्टाचारातील सत्य जनतेसमोर मांडले जाणार आहे.

विषय क्रमांक 7 –  वायसीएमएचमधील डॉक्टर भरतीतील भ्रष्टाचार, एका पद भरतीमागे 25 ते 30 लाख रुपयांचे रेट फुटला. त्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल. शिक्षक भरतीतील घोटाळा, पती-पत्नी एकत्रीकरणाच्या नावाखाली ग्रामीण भागातील शिक्षकांना महापालिका सेवेत समावून घेण्यासाठी प्रत्येक शिक्षकामागे 8 ते 10 लाखाचा झालेला व्यवहार या भरती प्रकरणातील भ्रष्टाचाराची माहिती जनतेसमोर मांडली जाणार आहे.

विषय क्रमांक 8 – भोसरी उड्डाणपुलाखाली तब्बल 32 कोटी रुपये खर्च करुन अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली करदात्यांच्या पैशांची झालेली लूट, अर्बन स्ट्रीटच्या नावाखालचा भ्रष्टाचार, रस्त्यांची रुंदी कमी करुन 7 मीटर फुटपाथ अनावश्यकपणे तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. राजकीय नेत्यांशी संबंधित कंपन्यांकडून पेविंग ब्लॉक खरेदीसाठी अर्बन स्ट्रीटचा खटाटोप, भोसरीचे रुग्णालय 30 वर्षासाठी खासगी संस्थेला चालवायला देऊन कोट्यवधी रुपये ठेकेदाराला देण्याचा डावा. याची माहिती जनतेच्या सभेसमोर दिली जाणार आहे.

विषय क्रमांक 9 – पर्यावरण, जलनि:सारण, भांडार, पाणीपुरवठा, माहिती व तंत्रज्ञान, आरोग्य, वैद्यकीय, शिक्षण, आयटीआय, क्रीडा आदी विभागांच्या कामाकाजात व खरेदीत भ्रष्टाचार झाल्याची प्रकरणे नित्याचीच आहेत. या सर्व विभागांच्या प्रकरणांची माहिती जनतेच्या महासपुढे मांडण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.