Pimpri News: महापालिका निवडणुकीत पवारसाहेबांना लक्ष घालावे लागले, म्हणजे आम्हाला हरविणे सोपे नाही – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – आमचे आमदार, नगरसेवक कसे नीट राहतील यासाठी आम्ही समर्थ आहोत. चारजण पक्ष सोडून गेले. त्यांना जाण्याचा पश्चाताप होईल. पिंपरी- चिंचवड महापालिका निवडणुकीत पवारसाहेबांना लक्ष घालावे लागले. म्हणजे आम्ही केवढे समर्थ आहोत. दोन पवार, मध्येच रोहित पवार, अमोल कोल्हे याचा अर्थ असा आहे की पिंपरी-चिंचवडमध्ये आम्हाला हरविणे सोपे नाही. म्हणूनच स्वतः पवारसाहेबांना महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घालावे लागत असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मागील शनिवारी, रविवारी शहरात येऊन आढावा घेतला. आजी-माजी नगरसेवकांची बैठक, कार्यकर्ता मेळावा घेतला होता. खासगी कार्यक्रमासाठी आज (शनिवारी) पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यावर भाष्य केले.

ते पुढे म्हणाले, “पूर्ण भारत एक आहे. ही आमची विचारधारा आहे. आम्ही त्याच्याशी फारकत घेऊ शकत नाही. आमची युती समविचारी पक्षाशी होते. संभाजी ब्रिगेडने त्या-त्या वेळी मांडलेल्या मतांची एकवाक्यता होणे शक्य नाही. मनसेसोबत युती होण्याची सुतराम शक्यता नाही. त्यांची परप्रांतीयबाबतची भूमिका भाजपला मान्य नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आम्हाला कंट्रोल करत नाही. पण, आम्ही त्यांच्यापासून प्रेरणा घेतो. त्यामुळे त्या विचाराशी थेठपणे विरोधाभास असे आम्ही करू शकत नाही”

महाराष्ट्रात दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यात महाराष्ट्र सरकार तत्परता दाखवत नाही. कारवाई करत नाही, मात्र शाहरूख खानच्या मुलाचा यांना पुळका आला आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक रोज काहीतरी त्यावर बोलतात. या सर्व प्रकरणामागील पाळंमुळे काढण्यासाठी हायकोर्ट जामीन देत नसेल, तर एवढं तडफडण्याचं काम नाही, असेही पाटील म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.