Pimpri News: कोरोनामुळे होऊ न शकलेली महापालिका कर्मचारी महासंघाची निवडणूक जाहीर

एमपीसी न्यूज – कोरोनाची तिसरी लाट आल्याने होऊ न शकलेली पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. 25 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान होणार असून त्याचदिवशी मतमोजणी होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ ही मान्यताप्राप्त संघटना आहे. या संघटनेत सहा हजार 200 सभासद आहेत. कर्मचारी महासंघाच्या पदाधिकारी व कार्यकारणीची सन 2022 ते 2024 या दोन वर्षाच्या कालावधीसाठीची निवडणूक जाहीर झाली होती. निवडणुकीसाठी अर्जही दाखल झाले होते. परंतु, शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. तिस-या लाटेत प्रचंड रुग्ण वाढत होते. त्यामुळे आयुक्त राजेश पाटील यांनी ही निवडणूक पुढे ढकलली होती.

आता शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या घटली आहे. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तुकाराम जाधव यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. 10 ते 11 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत नामनिर्देशन पत्र मागे घेता येतील. 11 फेब्रुवारी रोजी अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाईल. 14 फेब्रुवारी रोजी पॅनल प्रमुखाची निवड व चिन्ह वाटप करण्यात येईल. 25 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत महापालिका मुख्य इमारतीत मतदान होईल. त्याचदिवशी मतदान झाल्यानंतर मतमोजणी होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.