Pimpri News : तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाची बिकट परिस्थिती

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – लॉर्ड्सवर मोठा विजय मिळवून आत्मविश्वास वाढलेल्या भारतीय कर्णधार विराटने आजच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली खरी पण त्याचा हा निर्णय त्याच्यासह सर्वच प्रमुख फलंदाजांनी चुकीचा ठरेल अशीच कामगिरी केल्याने भारतीय संघ पहिल्या डावात सर्व गडी गमावून केवळ 78 धावाच जमवू शकला.

काही दिवसांपूर्वीच झालेल्या क्रिकेटच्या पंढरीत इंग्लंड संघाला चारी मुंड्या चीत करून पाच कसोटीच्या मालिकेत एक विरुद्ध शून्य अशी विजयी आघाडी घेणाऱ्या भारतीय संघांचा आत्मविश्वास सातव्या आसमंतावर होता, कर्णधार विराट कोहलीची वैयक्तिक कामगिरी त्याच्या दर्जाला साजेशी होत नसली तरी त्याची देहबोली कायम जोरात असते, त्यातच आज त्याने नानेफेक काय जिंकली गड्याने कुठलाही विचार न करता प्रथम फलंदाजी स्विकारली, मागच्या कसोटीतला हिरो राहुल आज काहीच करू शकला नाही, त्याला जिमी अँडरसनने पहिल्याच षटकात एका अप्रतिम स्विंग वर शून्य धावावर तंबुत पाठवले.

त्याच्याजागी आलेल्या आणि फॉर्मात नसलेल्या चेतेश्वर पुजाराला सुद्धा त्याच्या पाठोपाठ तंबूत धाडून भारताला दुसरा धक्का दिला, दुःखात सुख एवढेच की पुजारा काही चेंडू खेळला आणि एक धाव तरी जमवू शकला, अँडरसन आज तुफानी गोलंदाजीचे प्रदर्शन करत होता त्याने किंग कोहलीला सुद्धा बाद करत भारतीय संघाच्या डावाला खिंडार पाडले.

पाठोपाठ रहाणे सुद्धा बाद झाला आणि उपाहाराला भारतीय संघ चार बाद 56 अशा बिटक स्तिथीत होता. त्यानंतरच्या सत्रात सुद्धा अशीच कामगिरी चालू राहिली आणि एकापेक्षा एक मोठी नाव असलेले भारतीय फलंदाजी लक्षण खोटे करत तंबूत परतत होते, एका बाजूने रोहित शर्मा तग धरून आपल्या नैसर्गिक खेळाला मुरड घालून खेळत होता,पण दुसऱ्या बाजूने त्याला कोणीही टिकून साथ देऊ न शकल्याने तो ही तंबूत परतला.

अँडरसनने आपल्या अनुभवाचा अचूक वापर करत तीन गडी बाद केले, तर या मालिकेत पहिल्यांदाच खेळत असलेल्या ओव्हर्टनने ही तीन गडी बाद करत आपले नाणे सिद्ध केले, तर त्यांना सॅम करन आणि रॉबिनसनने दोन दोन गडी बाद करत उत्तम साथ दिली आणि भक्कम फलंदाजी असा नावलौकिक असलेल्या भारतीय संघाला केवळ 78 धावात बाद करून उत्तम सुरुवात केली आहे.भारतातर्फे रोहित शर्मा 19 तर अजिंक्य रहाणे 18 हे दोघेच दोन आकडी धावसंख्या नोंदवू शकले, एकंदरीतच आज भारतीय संघाने अत्यंत केविलवाणी कामगिरी करत आपल्या संघाला स्वतःच्या आत्मघातकी फलंदाजीने पिछाडीवर ढकलले आहे, हे निश्चित…

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.