Pimpri News : ‘मुळा नदी सुधार’साठी खासगी जागेचे भूसंपादन, नुकसान भरपाईपोटी द्यावे लागणार 175 कोटी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pimpri News) वतीने मुळा नदी पुनरुज्जीवन (सुधार) प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी नदीच्या डाव्या बाजूच्या अर्थात महापालिका हद्दीतील वाकड, पिंपळे निलख, सांगवीतील नदी काठच्या निळ्या पूर रेषेतील व निळ्या पूररेषेबाहेरील खासगी जागेचे भूसंपादन केले जाणार आहे. जमीनमालकांना नुकसान भरपाई देण्यासाठी 175 कोटी रुपयांच्या खर्चास महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली.

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका संयुक्तीपणे मुळा नदी सुधार प्रकल्प राबवित आहे. प्रकल्पाचा सल्लागार एकच असला. तरी, दोन्ही पालिकेने स्वतंत्र निविदाप्रक्रिया राबविली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने वाकड बायपास ते बोपखेल या 14.20 किलोमीटरपैकी वाकड ते सांगवी पुलापर्यंत असे 8.80 किलोमीटर अंतराच्या एका बाजूच्या कामासाठी 321 कोटी खर्चाची निविदा प्रसिद्ध केली आहे.

Alandi : प्रक्षाळपूजे निमित्त श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या मठामध्ये गर्दी

या प्रकल्पाच्या आराखड्यात निश्चित करण्यात आलेली नदीकाठची खासगी (Pimpri News) जागा भूसंपादित करण्यात येणार आहे. त्यात वाकड, पिंपळेनिलख व सांगवी या भागात निळ्या पूर रेषेतील व निळ्या पूर रेषेबाहेरील जागा आहे. त्या खासगी जागा भूसंपादन करण्यासाठी अंदाजे 175 कोटी नुकसान भरपाई जमीनमालकांना द्यावी लागणार आहे. हे भूसंपादन नगररचना व विकास विभागाकडून केले जाणार आहे. त्यासाठी येणा-या प्रत्यक्ष खर्चास आयुक्तांनी मान्यता दिली. या भूसंपादनासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची मान्यताही घेण्यात येणार आहे. भूसंपादन केल्यानंतर प्रकल्पाचे काम करणे सुलभ होणार असल्याचा पालिकेचा दावा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.