Pimpri News : मराठी भाषा लवकरच अभिजातच्या सिंहासनावर आरूढ होईल – खासदार श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे दूर नाही. त्याबाबतच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. लवकरच महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड च्या लढ्याला यश येईल आणि मराठी माणसाची अस्मिता असलेली मराठी भाषा अभिजातच्या सिंहासनावर आरुढ होईल असे आशावादी प्रतिपादन खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.

महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड आयोजित मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात बारणे बोलत होते. त्यावेळी व्यासपिठावर महाराष्ट्र राज्य मराठी पाठ्यपुस्तक शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ. शंकुतला काळे, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, कार्याध्यक्षा विनीता ऐनापुरे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी मुकेश कोळप उपस्थीत होते.

बारणे पुढे म्हणाले, “ज्ञानेश्वरी, गाथा, हे मराठी भाषेतील अभिजात ग्रंथ आहेत. मुळात मराठी भाषा ही अभिजातच आहे. सरकारी दरबारी त्याला न्याय मिळणारच यात शंका नाही.

सी ए भूषण तोष्णिवाल यांनी गायिलेल्या गणेश वंदना तसेच कविवर्य कुसुमाग्रज यांचा सर्वत्मका सर्वेश्वरा या कवितेने कार्यक्रमाची सुरवात झाली.

मराठी भाषा दिनानिमीत्त प्राची कुलकर्णी, प्रा. संपत गर्जे, विनीता श्रीखंडे, शर्मिला महाजन, सुरेखा कुलकर्णी, अपर्णा मोहिले, माधव गुरव, मंगला पाटसाकर, माधुरी डिसोजा, रमाकांत श्रीखंडे, सुरेखा कटारिया, प्रशांत थोरात, करुणा कंद, सुलभा सत्तुरवार, आदिनी मराठीतील विविध विषयावरील लेख, कथा, कविता, तथा नाटकातील उतार्याचे अभिवाचन करुन मराठी भाषेचा गौरव अधोरेखीत केला.

यावेळी विविध कार्यामध्ये आपला ठसा उमटविणारे संदीप राक्षे, संजय जगताप, पंजाबराव मोंढे यांचा सत्कार करण्यात आला. डॉ शकुंतला काळे, मुकेश कोळप यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. श्रीकांत जोशी, किशोर पाटील, रजनी शेठ यांनी संयोजन केले. राजन लाखे यांनी मराठी भाषेसाठी, मसाप पिंपरी चिंचवड शाखा राबवित असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. माधुरी मंगरूळकर व संजय जगताप यांनी सुत्रसंचालन केले. ऐनापुरे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.