Pimpri News: सत्ताधारी भाजपचे आयुक्तांवर आरोप म्हणजे ‘उल्टा चोर कोतवाल को डांटे’ – कैलास कदम

एमपीसी न्यूज – भाजपच्याच काही नगरसेवकांनी आपल्याच नेत्यांचे व महापालिकेतील भ्रष्टाचाराचे केलेले वस्त्रहरण, ठेकेदारी, टक्केवारीसाठी दोन आमदार, त्यांच्या बगलबच्च्यांमध्ये होत असलेली लूटमार, इतिहासात पहिल्यांदाच लाच प्रकरणी भाजपच्या पदाधिका-यांना झालेली अटक आदींमुळे अब्रूचे खोबरे झालेल्या सत्ताधा-यांनी आयुक्तांवर केलेले आरोप हास्यास्पद, जनतेचे लक्ष या घटनांवरून वेधण्यासाठी रचलेले हे षड्यंत्र आहे. बदनाम झालेल्या व अपयशी ठरलेल्या भाजपचे आयुक्तांवर आरोप म्हणजे ‘उल्टा चोर कोतवाल को डांटे’ असा प्रकार असल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी म्हटले आहे.

महापौर उषा ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्या कार्यपध्दतीवर टिका करत ‘आयुक्त विकास कामांना अडथळा निर्माण करतात असे आरोप केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस शहराध्यक्ष कदम म्हणाले, महापौरांचे व शहरातील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांचे आयुक्तांवरील रोषाचे कारण काही वेगळेच आहे. पण आत्ता ते वेगळेच कारण पुढे करत आयुक्तांना लक्ष करत आहेत; मात्र दर्शविलेल्या निमित्त कारणांसाठी रोष व्यक्त करण्याची वेळ चुकल्याने महापौरांच्या टिकेमागील वेगळे कारण उघड होत आहे.

शहरातील जनता सुज्ञ आहे. या जनतेने आजवर भाजपाच्या नेतृत्वाखाली असलेल्या कार्यकाळात मागील साडेचार वर्षांपासून झालेला भ्रष्टाचार पाहिला आहे. शास्तीकराच्या नावाने दिलेली खोटी आश्वासने पाहिली आहेत. स्मार्ट सिटीच्या नावाखाली सुरू असलेली ‘डार्क लूट ‘अनुभवली. कोरोना विषाणूंच्या काळात केलेले चुकीचे नियोजन त्यात झालेली प्राणहानी व त्यात सुध्दा केलेला भ्रष्टाचार ही जनतेने पाहिले आहे. कृत्रिम पाणी टंचाई व टँकर राज ही साखळी, शिक्षण मंडळातील बेधुंद व चुकीची खरेदी,एफडीआर घोटाळा, लाचलुचपत विभागाची धाड व रंगेहाथ पकडलेले पदाधिकारी, पर्यावरणाचे प्रश्न, नद्यांची स्वच्छता, आरोग्यसुविधा, काँक्रिट रोड मधील मधील भ्रष्टाचार, निगडीत मृतदेहाची झालेली विटंबना, यासह इतरही अनेक अनियोजित घटना व बाबींच्या संदर्भात ‘महापौर का बोलत नाही ‘? हा जनतेचा सवाल मी काँग्रेस कडून महापौरांना जाहीरपणे विचारत आहे. यास कोण जबाबदार आहे? याचे उत्तर महापौरांनी द्यावे, असे कदम म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.