Pimpri News: भाजपच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा अन् विकासाचा अजेंडा घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार – अजित गव्हाणे

राष्ट्रवादीच्या नवनियुक्त पदाधिका-यांची 'एमपीसी न्यूज'च्या कार्यालयाला सदिच्छा भेट

एमपीसी न्यूज – ‘ना भय, ना भ्रष्टाचाराचा नारा देऊन भाजपने सत्ता मिळविली. पण, प्रत्यक्षात शहरात भ्रष्टाचार आणि भीतीचे वातावरण आहे. मागील पाच वर्षात एकही काम भ्रष्टाचारविरहित झाले नाही. भाजपचा भ्रष्ट कारभार जनतेच्या लक्षात आल्याने जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. राष्ट्रवादीने मागील 15 वर्षात केलेला शहराचा विकास, पुढच्या 50 वर्षांचे ‘व्हिजन’ आणि भाजपचा भ्रष्टाचाराचा मुद्दा जनतेसमोर घेऊन महापालिका निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सांगितले.

शहराध्यक्ष गव्हाणे, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख यांनी आज (सोमवारी) ‘एमपीसी न्यूज’ (mpcnews.in) च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. ‘एमपीसी न्यूज’चे संपादक विवेक इनामदार, सहयोगी संपादक अनिल कातळे आणि मुख्य वार्ताहर गणेश यादव यांनी त्यांचे स्वागत केले. गव्हाणे यांनी ‘एमपीसी न्यूज’च्या टीमशी संवाद साधताना भाजपच्या कारभारावर टीका करत आगामी महापालिका निवडणुकीबाबतची राष्ट्रवादीची दिशा स्पष्ट केली.

शहराध्यक्ष गव्हाणे म्हणाले, ”भाजपने प्रत्येक कामात रिंग केली. अंदाजपत्रक फुगवायचे, काम मॅनेज करायचे, जवळच्या माणसाला काम द्यायचे, ठेकेदारांना भागीदारी मागायची. प्रत्यक्षात काम व्यवस्थित न करता बिले काढायची. पाच वर्षात एकही काम भ्रष्टाचारविरहित झाले नाही. खरेदी, शिक्षक, डॉक्टर भरती, कुत्र्यांच्या नसबंदीत भ्रष्टाचार केला. स्मार्ट सिटीत मोठा घोटाळा केला. उपठेकेदार नेमण्याची परवनागी नसतानाही उपठेकेदार नेमले. उपठेकेदार कोण आहेत हे संपूर्ण शहराला माहिती आहे. तांत्रिक मान्यता न घेता बेकायदेशीरपणे कोट्यवधी रुपयांची कामे दिली. स्मार्ट सिटीत मनमानी पद्धतीने काम केले जाते”.

”भाजपचा भ्रष्ट कारभार जनतेच्या लक्षात आला आहे. भाजपकडून जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शहराची प्रगती झाली. शहराकडे रोल मॉडेल म्हणून बघितले जात होते. शहराला बेस्ट सिटीचा पुरस्कार मिळाला. 15 वर्षात झालेल्या कामाचा आलेख भाजपने पाच वर्षात खाली आणला. राष्ट्रवादीने मागील 15 वर्षात केलेला शहराचा विकास, पुढची 50 वर्षे डोळ्यासमोर ठेऊन शहराचा करण्यात येणारा विकास आणि भाजपचा भ्रष्टाचाराचा मुद्दा जनतेसमोर घेऊन आगामी निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. काँग्रेसची एकला चलो रे ची भूमिका आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी होईल असे चित्र दिसत आहे. अर्थात त्याचा निर्णय राज्य पातळीवर होईल, असेही ते म्हणाले.

बाहेरचे नेतृत्व असा अपप्रचार करणा-यांना अजितदादांनीच मोठे केले

शरद पवार, अजित पवार, पार्थ पवार हे पुणे जिल्ह्यातीलच आहेत. भाजपकडून निवडणुकीसाठी ते बाहेरचे असल्याचा प्रचार केला जातो. पण, असा अपप्रचार करणा-यांना अजितदादांनीच मोठे केले. त्यांनाही दादांनीच घडविले हे शहरातील जनतेला माहिती आहे. अजितदादा सकाळी सहा वाजता पिंपरी-चिंचवड शहरात येऊन विकास कामांची पाहणी करतात. दादांनी बारामतीपेक्षा पिंपरी-चिंचवड शहरावर जास्त प्रेम केले. शहरातील विकासाकडे त्यांचे बारीक लक्ष असते. शहरातील कारखानदारीला पवारसाहेबांनी चालना, पोषक वातावरण निर्माण केले. हिंजवडी आयटी पार्क आणले. त्यामुळेच शहराची ओळख जगभरात आहे. पवारसाहेब, अजितदादांचे पहिल्यापासून शहरावर प्रेम आहे. भाजपचा कोणता नेता शहरातील कामाची पाहणी करण्यासाठी येतो, असा सवाल गव्हाणे यांनी केला.

भाजपने पाच वर्षे विरोधकांचा आवाज दाबला

यापूर्वीच्या काळात सभागृहात आल्यानंतर पक्षीय जोडे बाजूला ठेऊन काम केले जात होते. पण, भाजपने वेगळा पायंडा पाडला. भाजपकडे पाशवी बहुमताच्या जोरावर राष्ट्रवादीच्या लोकांना बोलू दिले नाही. माईक बंद करुन बोलणे थांबवत होते. एखाद्या कमी महत्वाच्या विषयावर जाणीवपूर्वक खूप वेळ चर्चा करायचे आणि शेवटी विषय रेटून नेत उपसुचनांसह मंजूर केले जात होते. पाच वर्ष अर्थसंकल्पावर बोलू दिले नाही. मंजुर झाल्यावर बोलण्याला काही अर्थ नसतो. सभा कामकाजात भाजपने नियमांचे पालन केले नाही. पाच वर्षात भाजपच्या नगरसेवकांनाही काय कळले नाही. त्यांच्या स्वातंत्र्यांवर गदा आली होती. नगरसेवकांना भाषणे लिहून दिली जात होती. त्यामुळे आम्ही विरोध केला नाही हा आरोप चुकीचा असून सत्ताधा-यांनी आमचा आवाज दाबल्याचे गव्हाणे म्हणाले.

नव्या-जुन्यांची सांगड घालून निवडणुकीला सामोरे जाणार

पक्ष संघटनेत सक्रिय पदाधिका-यांना पदावर कायम ठेवले जाणार आहे. काही ठिकाणी नवीन लोकांना संधी दिली जाईल. महापालिका निवडणुकीला वेळ थोडा आहे. त्यामुळे प्रयोग न करता नव्या-जुन्यांची सांगड घालून निवडणुकीला सामोरे जाणार आहे. कोणावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आणायची आहे. त्यामुळे निवडून येण्याची क्षमता असणा-यांना संधी द्यायची अशी अजितदादांची भूमिका असल्याचे गव्हाणे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.