Pimpri News: ‘खचू नका, महापालिका तुमच्या पाठीशी’; उमेद जागर कार्यक्रमाचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज – कोणत्याही संकटाला घाबरून खचून जाईल, अशी कोणतीही स्त्री कमकुवत नाही. तुम्ही दुर्गा आहात. आलेले संकट खूप मोठे आहे. मात्र, तुम्ही खचू नका, पदर खोचून उभ्या रहा. पिंपरी-चिंचवड महापालिका तुमच्या पाठीशी आहे, अशा शब्दात महापौर उषा  ढोरे यांनी आज (सोमवारी) महिलांचे मनोबल वाढविले.

कोरोनामुळे पतीचे निधन झाल्याने वैधव्य आलेल्या महिलांचे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने समुपदेशन करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने उमेद जागर हा उपक्रम क्षेत्रीय स्तरावर राबविण्यात येणार आहे. त्याचा प्रारंभ  महापौर ढोरे यांनी भोसरी येथील स्व. अंकुशराव लांडगे सभागृहात केला. त्यावेळी महापौरांना महिलांशी संवाद साधला.

सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, नागरवस्ती विभागाचे उपआयुक्त अजय चारठाणकर, सहा. आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, ज्येष्ठ वैद्यकिय अधिकारी ड़ॉ. शैलजा भावसार, प्रशासन अधिकारी नाना मोरे आदी उपस्थित होते.

महापौर ढोरे म्हणाल्या की, कोरोना महामारीचे संकट खूप मोठे आहे. हसत्या खेळत्या कुटुंबातील अनेक ‘ कर्ते ‘ निघून गेले. यासारखे मोठे दुःख नाही. मात्र, खचून, नाउमेद होऊन चालणार नाही. मोठा पल्ला गाठायचा आहे. स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे. त्यासाठी उमेद जागर हा उपक्रम नक्कीच तुम्हाला उभारी देईल. उमेद निर्माण करेल. आपल्या हातात एखादी कला असेल, एखादे काम आपल्याला येत असेल तर उमेद जागर हा उपक्रम तुमच्या या कलेला, तुमच्या कामाला बळकटी मिळवून देईल.

पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिक शहर आहे. अनेक कंपन्या येथे आहेत. त्यामुळे तुम्ही सहकार्य मागा. उमेद जागर या कार्यक्रमातून तुम्हाला शक्य तितके सहकार्य केले जाईल. त्यामुळे खचून, डगमगून न जाता खंबीरपणे उभे राहिल्यास दुःखाचा हा काळ नक्कीच मागे पडेल. अनेक कुटुंबे नोकरी नाही, कोणाचे पाठबळ नाही, म्हणून हे शहर सोडून जाण्याचा विचार मनात आणत असेल तर असे करू नका.

हे शहर, पिंपरी-चिंचवड महापालिका नक्कीच तुमचे पालकत्व स्वीकारत आहे. यासाठी तुम्हाला उमेद जागर उपक्रमाअंतर्गत 25 हजारांची आर्थिक मदत देणार आहेच. शिवाय तुम्हाला, तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांना नोकरी, स्वयं उद्योग, लघुउद्योग करण्याला पाठिंबा देखील देणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या या उपक्रमासोबत अनेक सामाजिक संघटना, एनजीओ देखील जोडले जाणार आहेत. या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे.

अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप म्हणाले, “उमेद जागर उपक्रमाअंतर्गत महिलांचे समुपदेशन करणे, विविध योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी त्यांच्याशी समन्वय साधणे तसेच कौशल्य विकास वाढीसाठी महिलांना प्रशिक्षण देणे व रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय साधण्यात येणार आहे. यावेळी त्यांनी उपस्थित महिलांना स्व-मदत गट स्थापन करण्याचे आवाहन केले.

नागरवस्ती विभागाचे उपआयुक्त अजय चारठाणकर यांनी महिलांना वारसा नोंदणी प्रमाणपत्र, कायदेविषयक सल्ला, रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन केले, सहा.आयुक्त अण्णा बोदडे यांनी उमेद जागर उपक्रमाची माहिती दिली.

पुणे सिटी कनेक्ट लाईट हाऊसच्या प्राजक्ता जंगम यांनी महिलांना विविध प्रकारच्या योजना, कोर्स याबद्दल मार्गदर्शन केले. सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘उमेद जागर’ उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाचे संपूर्ण नियोजन व अंमलबजावणी नागरवस्ती विभागामार्फत करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास बहाद्दरपुरे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.