Pimpri : सोनारासमोरच केला एक लाखांच्या सोन्यावर हात साफ

एमपीसी न्यूज – मंगळसूत्र घेण्यासाठी आलेल्या दोन महिलांनी सोनार दुकानातील विविध डिजाईनचे सोन्याचे मंगळसूत्र दाखवत असताना एक लाख चार हजार 368 रुपये किमतीची दोन मंगळसूत्र लंपास केली. ही घटना गुरुवारी (दि. 6) सायंकाळी सहाच्या सुमारास संत तुकारामनगर मधील कैलास ज्वेलर्स या दुकानात घडली.

हंसराज प्रेमराज चौधरी (वय 34, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हंसराज यांचे कैलास ज्वेलर्स नावाचे संत तुकाराम नगरमध्ये सोन्याचे दुकान आहे. या दुकानात गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास दोन महिला सोन्याचे मंगळसूत्र खरेदी करण्यासाठी आल्या. हंसराज त्यांना वेगवेगळ्या डिजाईनचे मंगळसूत्र दाखवत होते. त्या महिला सुमारे अर्धा तास वेगवेगळे मंगळसूत्र बघत होत्या. त्यांनी हंसराज यांच्या परस्पर एक लाख चार हजार 368 रुपये किमतीची दोन मंगळसूत्र लंपास केली. ही बाब लक्षत येताच हंसराज यांने पिंपरी पोलिसात धाव घेतली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.