Pimpri : सांगली, कोल्हापूर येथील महापूरग्रस्तांच्या मदतीसाठी पिंपरीकारांनी काढली मदत फेरी

एमपीसी न्यूज – सांगली, कोल्हापूर येथे अतिवृष्टीमुळे गावच्या गावे जलमय होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. या परिसरातुन लोकांना बाहेर काढणे ही अवघड झाले आहे. अशा परस्थितीत तेथील रहिवासी गेले पाच ते सहा दिवस घरच्या छतावर अन्न पाण्याविना अद्याप अडकून आहेत. भारतीय सैन्य व बऱ्याच सामाजिक संस्था या लोकांना पूरपरिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. मदत कार्यातही अडथळे निर्माण होऊन व्यवस्थित मदत कार्य पोहोचत नाही. या महापुरात लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना परत सावरून आपलं जीवन सुरळीत व्हावे, यासाठी सर्व थरातून मदत कार्य सुरू आहे. सांगली, कोल्हापूर येथील महापूरग्रस्तांच्या मदतीसाठी शनिवारी पिंपरीकरांनी मदत फेरी काढली.

सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून, आज पिंपरीतील सामाजिक कार्यकर्ते एकत्रित येऊन पूरग्रस्तांसाठी मदत फेरी काढण्यात आली. या मदत फेरीत पिंपरीतील नागरिक, सिंधी, पंजाबीबांधवांनी कपडे, खाद्यपदार्थ, धान्य, जीवनावश्यक वस्तू तसेच चप्पल, चादर, ब्लँकेट असे अनेक गोष्टीची सढळ मदत केली. त्याच बरोबर दान पेटीतही या फेरीत फिरविण्यात आली त्यातही नागरिकांनी सढळ हाताने मदत केली. हे सर्व जमा झालेले साहित्य दोन दिवसात पूरग्रस्तांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे.

  • मदत फेरीत तीन छोटे टेंपो घेऊन सामाजिक कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, पिंपरी पासून वाघेरे कॉलनी मार्गे, संत सावतामाळी मंदिर, तपोवन रोडने भाटनगर मार्गे पिंपरी मेन बझार, शगुन चौक, साई चौक मार्गे अशोक टॉकीज, पिंपरी पॉवर हौस मार्गे परत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक अशी मदत फेरी काढण्यात आली.

यावेळी जमा झालेले तांदूळ, साखर, डाळी असे अनेक प्रकारचे अन्न धान्य स्वछ करून दोन दोन किलोचे पॅकिंग करणायचे काम पिंपरीतील मातृशक्ति महिला वर्ग श्री काळभैरवनाथ मंदिरात करत आहेत. यावेळी या मदत फेरीत बजरंग दल, सोलापूर विभाग सह संयोजक कुणाल साठे, सामाजिक कार्यकर्ते संतोष गोलांडे, शेखर अहिरराव, गौरव कुदळे, प्रविण शिंदे, अतुल वाणी, अनिल कारेकर, कुणाल सातव, महेश मोटवणी, अभिभाऊ चव्हाण, मुकुंद चव्हाण तसेच बजरंग दलाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

  • मदत कार्यात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांनी पुरात अडकलेल्या लोकांना त्यांचे जनजीवन सुरळीत होऊन त्यांचे भावी जीवन सुखमय जावो, अशा शुभेच्छाही देत होते, अशी माहिती मुकुंद चव्हाण यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.