Pimpri: प्रचाराची सांगता; पावसाने बिघडवले नियोजन

एमपीसी न्यूज – मागील बारा दिवसांपासून सुरु असलेला विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा गदारोळ आज (शनिवारी) सायंकाळी सहा वाजता थांबला. उमेदवारांकडून आजच्या शेवटच्या दिवशी रॅली, पदयात्रा काढून प्रचाराची सांगता केली. शहरात सकाळपासून रिमझीम सुरु असलेल्या पावसाने अनेकांचे नियोजन बिघडविले आहे. दरम्यान, प्रचारादरम्यान राष्ट्रीय नेत्यांनी शहराकडे पाठ फिरविली आहे. एकाही राष्ट्रीय नेत्याची शहरात सभा झाली नाही.

विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्‍टोबर रोजी मतदान होत असून 24 ऑक्‍टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. 48 तास अगोदर प्रचार थांबवावा लागतो. त्यानुसार आज प्रचाराची सांगता झाली आहे. आता छुप्या पद्धतीने प्रचार करण्यावर उमेदवार, कार्यकर्त्यांकडून भर दिला जाईल. प्रचार थांबल्यानंतर प्रचार करताना आणि मतदाराला आमिष दाखविताना उमेदवार, कार्यकर्ते आढळल्यास त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल होतो.

यावेळी विधानसभा निवडणुकीतील प्रचाराला केवळ 12 दिवसांचा कालावधी मिळाला. कमी कालावधीत उमेदवारांनी रॅली, पदयात्रा, कोपरा सभेच्या माध्यमातून शेवटच्या मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. प्रचार रॅली काढून उमेदवारांकडून प्रचाराची सांगता करण्यात आली.

राष्ट्रीय नेत्यांची शहराकडे पाठ
पिंपरी-चिंचवड शहरातील उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यातील नेत्यांच्याच सभा झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री पंकजा मुंडे यांच्या जाहीर सभा झाल्या. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची रॅली झाली. मात्र, एकाही राष्ट्रीय नेत्याची सभा झाली नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील शहरात सभा घेतली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.