Pimpri: कोविडसाठी उपलब्ध असलेल्या बेडची माहिती दररोज प्रसिद्ध करा, ‘पीसीसीएफ’ची मागणी

Pimpri: Publish daily information of beds available for Covid, PCCF demand नागरिकांना उपलब्ध बेडची माहिती मिळाल्यास नागरिक त्या-त्या रुग्णालयातच जातील.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिका, खासगी रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या बेडची माहिती दररोज प्रसिद्ध करावी. सारथी हेल्पलाईन, कोविड डॅशबोर्ड, मोबाईल अ‍ॅप्लिकेशन आणि हेल्पलाईन नंबर माहिती प्रसिद्ध करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमने (पीसीसीएफ) केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन ई-मेल करण्यात आले आहे. त्यात पीसीसीएफने म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. रुग्णसंख्येचे दररोज उच्चांक होत आहेत.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयातील बेडची उपलब्धतता देखील कमी आहे. कोणत्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत. त्याची माहिती रुग्णांना मिळत नाही.

त्यामुळे अनेक पॉझिटिव्ह रुग्ण रुग्णालयात दाखल होण्यासाठी येतात. परंतु, बेड उपलब्ध नसल्याने त्यांना ताटकळत थांबावे लागते. त्यामुळे रुग्णांना उपचाराला विलंब होतो. त्यातून एखाद्याचा उपचाराअभावी मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पॉझिटिव्ह रुग्ण बाहेर थांबल्यास त्यांच्यापासून इतरांना संसर्गाचा धोका होण्याची भीती देखील आहे. त्यामुळे शहरातील महापालिका, खासगी रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी किती बेड उपलब्ध आहेत. याची नागरिकांनी माहिती मिळणे आवश्यक आहे.

नागरिकांना उपलब्ध बेडची माहिती मिळाल्यास नागरिक त्या-त्या रुग्णालयातच जातील. त्यामुळे महापालिकेने रुग्णालयातील उपलब्ध बेडची माहिती दररोज प्रसिद्ध करावी.

महापालिकेची सारथी हेल्पलाईन, कोविड डॅशबोर्ड, मोबाईल अ‍ॅप्लिकेशन आणि हेल्पलाईन नंबरवर दररोज उपलब्ध बेडची माहिती प्रसिद्ध करावी. जेणेकरुन रुग्णांना बेडची माहिती मिळेल. त्यांना रुग्णालयात बेड अभावी ताटकळत थांबावे लागणार नाही. त्यामुळे रुग्णालयात गर्दी देखील होणार नाही.

या निवेदनावर ‘पीसीसीएफ’चे मुख्य समन्वयक तुषार शिंदे, मुकेश पेरवाणी, प्रवीण अहिर यांच्या स्वाक्ष-या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like