Pimpri: ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाविरोधात शिवसेनेचे आंदोलन; पुस्तकावर बंदी घालण्याची केली मागणी

एमपीसी न्यूज – ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाविरोधात पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने आज (सोमवारी) आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी आंदोलकांनी केली.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात झालेल्या आंदोलनात शहरप्रमुख योगेश बाबर, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शिरुर जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शहर संघटिका उर्मिला काळभोर, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, युवराज कोकाटे, सरिता साने, नाना काळभोर आदी सहभागी झाले होते.

भाजपच्या आजारी मानसिकतेचा धिक्कार असो, ‘जाहीर निषेध, जाहीर निषेध’ असे फलक आंदोलकांनी हातामध्ये घेतले होते.

  • काय आहे प्रकरण?
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे. ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन भाजपच्या दिल्ली कार्यालयात झाले आहे. भाजप नेते जय गोयल यांनी हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकावरुन भाजपवर टीकेची झोड उठली आहे. पुस्तकाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत असून या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.