Pimpri : महामेट्रोचे साहित्य चोरीला; महिनाभरानंतर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – महामेट्रोचे 65 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 11 नोव्हेंबर रोजी पहाटे वल्लभनगर, पिंपरी येथे घडली. याप्रकरणी तब्बल महिनाभरानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमनाथ नागनाथ गायकवाड (वय 38, रा. क्रांतीवीर नगर, थेरगाव) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इनवायर इंजिनिअरिंग इंडिया प्रा. लिमिटेड या कंपनीमध्ये फिर्यादी गायकवाड हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. 11 नोव्हेंबर रोजी पहाटे तीन ते सकाळी आठ वाजताच्या दरम्यान वल्लभनगर येथे सुरू असलेल्या महामेट्रोच्या कामाच्या साइटवरून अज्ञात चोरट्यांनी 25 हजार रुपये किंमतीच्या 25 स्टील स्ट्रक्‍चरच्या प्लेटस्‌, 40 हजार रुपये किंमतीचे 40 लोखंडी चैनल असा एकूण 65 हजार रुपये किंमतीचा माल चोरून नेला.

याबाबत गायकवाड यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात अर्ज दिला होता. या अर्जावरून मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.