_MPC_DIR_MPU_III

Pimpri: ‘कायम लोकांसाठी झटणारा महापालिका सभागृहातील वाघ गेला’

पिंपरी-चिंचवड शहरातील लोकप्रतिनिधी व जुन्या सहकाऱ्यांनी वाहिली दत्ता साने यांना श्रद्धांजली

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने दिलदार, खुल्या आणि मनमिळाऊ स्वभावाचे होते. नेहमी प्रवाहाच्या विरोधात वाहणारा कार्यकर्ता होता. कधी कोणाला नाहक त्रास दिला नाही. कोणाबाबत मनात वाईट नव्हते. सर्वांना सहकार्य करण्याची भूमिका घेत. कर्तव्यतत्पर नेता होता. कायम लोकांसाठी झटणारा महापालिका सभागृहातील वाघ गेला अशा शब्दांत आठवणींना उजाळा देत शहरातील लोकप्रतिनिधीनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना काकांना श्रद्धांजली वाहिली. 

विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आज (शनिवारी) सकाळी चिंचवड येथील खासगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले आहे.  साने यांना 25 जून रोजी कोरोनाची लागण झाली होती. उमदा कार्यकर्ता  गेल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यासंदर्भात एमपीसी न्यूजने शहरातील प्रमुख नेते व दत्ता काकांचे अनेक वर्षांच्या सहकाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या.

महापालिका सभागृहातील वाघ गेला –  महापौर उषा ढोरे

दत्ताकाका मनमिळाऊ स्वभावाचे होते. कधी कोणाला तोडून बोलले नाहीत. जनतेच्या प्रश्नांसाठी सभागृहात नेहमी आवाज उठवीत होते. विरोधात असले तरी आपला मुद्दा पटवून देत तो प्रश्न सोडवून घेत असत. प्रभागात त्यांचे बारीक लक्ष होते. सभागृहातील वाघ गेला, या शब्दांत पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा तथा माई ढोरे यांनी साने यांना श्रद्धांजली अर्पण केली.

दिलदार मित्र गमावला – श्रीरंग बारणे

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, महापालिका सभागृहात आम्ही सोबत काम केले. स्पष्ट वक्ता, मनमिळाऊ स्वभावाचा दिलदार मित्र गमावला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर माझे तीनवेळा बोलणे झाले होते. ते घाबरले, खचले होते. चांगला मित्र हरपल्याचे दुःख झाले.

दत्ता साने यांची 25 वर्षांची साथ – आमदार लक्ष्मण जगताप

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, दत्ताकाका चांगला दिलदार मित्र होता. खुल्या मनाचा होता. दिवंगत महापौर मधुकर पवळे यांच्यापासून तो माझ्याबरोबर असायचा. 25 वर्ष आम्ही बरोबर होतो. काही महिन्यांपूर्वी आम्ही एकत्र 15 दिवस परदेशात गेलो होतो. बरोबर राहिलो, फिरलो होतो. उमद्या मनाचा दिलदार मित्र अकाली आघात करून जायला नको होता.

राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी हानी – संजोग वाघेरे

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले, महापालिका सभागृहात लोकांच्या प्रश्नांसाठी भांडून प्रश्न सोडून घेण्याची त्यांची वेगळी कला होती. नेहमी लोकांसाठी झटत राहणारा कार्यकर्ता होता. काकाच्या निधनाने पक्षाची मोठी हानी झाली असून ढाण्या वाघ गेला आहे.

सामाजिक बांधिलकी असणारा कार्यकर्ता गेला – विलास लांडे

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे म्हणाले, सामाजिक बांधिलकी असणारा, गोरगरीब जनतेसाठी  काम करणारा, भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविणारा दत्ताकाका अचानक निघून गेला. आदरणीय शरद पवार साहेब यांच्यावर मनापासून प्रेम करणारा कार्यकर्ता होता. अजितदादांचे त्याला मार्गदर्शन असत. ज्यावेळी ग्रामीण भागातील गावे महापालिकेत समाविष्ट केली. परत वगळली आणि घेतली. त्या गावातील घरांच्या कराचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी अजितदादांच्या माध्यमातून रात्री साडेबारा वाजता  मंत्रालयात बसून नगरविकास विभागाचा आदेश काढून घेतला होता. त्यावेळी आम्ही सोबत होतो. जनतेच्या कामासाठी आग्रही असणारा कामाचा माणूस गेला आहे. महापालिकेत विरोधी पक्षनेता असताना भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविला. जनतेची प्रामाणिकपणे सेवा करणारा सहकारी गेला आहे. खूप मोठे नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातील  गोरगरिबांसाठी, कष्टकरी, दिन दलितांसाठी काम करणारा नेता. विश्वासु मित्र गेला आहे. काकांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेसचे फार मोठे नुकसान झाले आहे. शहरात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांची स्वप्ने पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो.

मनाला पटेल तेच करणारा मनस्वी कार्यकर्ते हरपला – योगेश बहल

माजी महापौर योगेश बहल म्हणाले, दत्ताकाका आणि मी बजाज ऑटोत सोबत कामाला होतो. माझ्यानंतर त्यांनीही कंपनीतील काम सोडले. एखादी गोष्ट नाही पटली तर वेळप्रसंगी पक्षाच्या विरोधात भूमिका घेत असत. पण जे मनाला पटेल तेच करत असत. कोणाची भीड बाळगत नव्हते. सर्वांना सहकार्य करण्याची भूमिका घेत. कधी कोणाला नाहक त्रास दिला नाही.  कोणाचे नुकसान केले नाही. विरोधी पक्षनेता म्हणून चांगली कामगिरी केली.  अनेक वर्षे बाकीच्या पदांची इच्छा होती. आमदारकीची निवडणूक लढविण्याची  इच्छा होती. परंतु, संधी मिळाली नाही. सर्वांना सहकार्य करणारा कर्तबगार नेता गमावला आहे. काकांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे.

‘मातोश्री’ म्हणून हाक मारणारा कुटुंब सदस्य गेल्याचं दुःख – सुलभा उबाळे 

शिवसेनेच्या सुलभा उबाळे म्हणाल्या, आम्ही सभागृहात नगरसेवक म्हणून सोबत होतो. बोलताना काका मला ‘मातोश्री’ म्हणून हाक मारत असत. त्यामुळे कुटुंबातील सदस्यच गेल्याचं दुःख झालंय. काका कधीही कोणाला उलट बोलत नसे. अनेकदा एखादी गोष्ट करू नको, म्हटले तरी काका मनाला वाटेल तेच करत असे. कधी कोणाचे ऐकले नाही. काका नेहमी प्रवाहाच्या विरोधात पोहत असत. नेहमी लोकांमध्ये राहणारा काका कोरोनाच्या काळातही लोकांमध्ये मिसळला. स्वभावाप्रमाणेच कोरोनाच्या काळातही प्रवाहाच्या विरोधात गेला. काकाने काळजी घ्यायला हवी होती.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.