Pimpri : विलास लांडे, संजोग वाघेरे काय भूमिका घेणार?

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मावळ आणि शिरुर मतदार संघाचे उमेदवार आज (शुक्रवारी) जाहीर केले आहेत. मावळ मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना तर शिरुर मतदारसंघाची अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निवडणुकीसाठी मावळातून इच्छुक असलेले संजोग वाघेरे यांनी नाराज नसल्याचे सांगितले. तर, शिरुरमधून तीव्र इच्छुक असलेल्या विलास लांडे यांनी नंतर बोलतो असे सांगत यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला. त्यामुळे दोघे काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे हे मावळमधून लोकसभा लढविण्यासाठी तीव्र इच्छूक होते. त्यादृष्टीने त्यांना तयारी देखील सुरु केली होती. परंतु, सहा महिन्यांपूर्वी अचानक माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचे नाव पुढे आले. त्यांचे शहरातील दौरे वाढले होते. त्यामुळे वाघेरे यांचे नाव मागे पडले होते आणि झालेही तसेच. पार्थ यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडली.

शिरुर लोकसभा मतदार संघातून भोसरीचे माजी आमदार विलास लांडे तीव्र इच्छुक होते. त्यांनी गेल्या तीन महिन्यांपासून निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली होती. मतदार संघात दौरे सुरु केले होते. जुन्या-नव्या नेत्यांच्या गाठीभेटी सुरु केल्या होत्या. मतदार संघातील प्रलंबित प्रश्नांबाबत आवाज उठविला होता. आंदोलने केली होती. विद्यमान खासदारांवारील टीकेला धार आली होती. त्यामुळे लांडे यांची उमेदवारी निश्चित असल्याचे बोलले जात होते. परंतु, पक्षाने शिवसेनेचे उपनेते डॉ. अमोल कोल्हे यांना पक्षात घेतले आणि त्यांना उमेदवारी दिली. उमेदवारी नाकारल्याने वाघेरे आणि लांडे काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

याबाबत ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना संजोग वाघेरे म्हणाले, ”मी नाराज नसून शरद पवार आणि अजित पवार यांना मानणारा माणूस आहे. पिंपरी-चिंचवड शहरासाठी अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीने अतिशय चांगले काम केले आहे. त्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे. पार्थ पवार यांना आमचे पूर्ण समर्थन राहील. त्यांना जास्तीत-जास्त मतांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. प्रचाराशी दिशा पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून ठरविण्यात येईल. दोन दिवसात त्याबाबत बैठक होणार आहे”

तर, विलास लांडे यांनी नंतर बोलते असे सांगत उमेदवारी नाकाल्याबाबत अधिक भाष्य करण्यास नकार दिला. मात्र, त्यांचे कार्यकर्ते सोशल मिडियावर आक्रमक झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.