Maharashtra News : बीएचआर प्रकरणी ठोस पुरावे हाती, बड्या हस्तींचा हस्तक्षेप असण्याची शक्यता 

एमपीसी न्यूज : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑप सोसायटीमध्ये (बीएचआर )झालेल्या कोट्यावधी रूपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अवसायकासह पाचजणांना अटक केली आहे. याप्रकरणी पुणे पोलिस पथकाला ठोस पुरावे हाती लागले आहेत. त्यामध्ये विविध कागदपत्रे, कॉम्प्युटर, सीपीयूचा समावेश आहे. त्यामुळे आता याप्रकरणी बड्या हस्तींचा हस्तक्षेप असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. 

मल्टी-स्टेट  बी.एच.आर. सोसायटीत तब्बल दीड हजार कोटींच्या घोटाळ्यात ठेवीदारांच्या रक्कम परत देण्यासाठी जितेंद्र कंडारे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, कंडारे यांनी कर्जदारांच्या जमिनी आणि मालमत्ता विकल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या आर्थिंक गुन्हे शाखेसह पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कंडारे यांच्यासह बीएचआर संचालकाच्या जळगावासह औरंगाबादमधील घरी छापे टाकले.

त्यामध्ये ठेवीदारांच्या पावत्या, कर्जदारांचे शपथपत्रे, अनेक बनावट शिक्के आहे. त्यातील ही कागदपत्रे लिलावामधील आहेत की तारण म्हणून घेतलेली आहेत, याची तपासणी सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी पुणे पोलिसांनी स्वतंत्र पथक तयार केले आहे.  अटक केलेल्या आरोपीचे जबाब नोंदवून घेण्याचे कारण स्वतंत्र पथक करीत आहेत.

पुणे, पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अधिका-यांसह १५२ कर्मचा-यांनी जळगावसह औरंगाबादमध्ये अडीच दिवस तळ ठोकून संबंधितांविरूद्ध कारवाई केली आहे.

बीएचआर घोटाळ्याप्रकरणी पुणे, पिंपरी आणि पुणे ग्रामीणला प्रत्येकी एक मिळून तीन गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी बी. एच. आर. पतसंस्थेचे अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या जळगावातील शिवाजीनगरमधील घरी शुक्रवारी सकाळी साडेसातलाच आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकल्याने खळबळ उडाली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.