Pune News : कचरा प्रक्रियेचे काम ठेकेदारांना विनानिविदा देण्यास स्थगिती द्या

शिवसेना, काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज : पुण्यातील रामवाडी येथील सुमारे 40 हजार टन कचर्‍यावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्याचे काम ठेकेदारांना विनानिविदा देण्यासाठीचा प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला आहे. या कामासाठी सुमारे 9 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. कचरा प्रक्रियेचे काम ठेकेदारांना विनानिविदा देण्याच्या प्रकियेला स्थगिती द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार आणि काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल नऊशे रुपये प्रतिटन प्रक्रिया खर्च करून रामवाडी येथील 40 हजार मेट्रिक टन कचर्‍यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्यामुळे पालिका प्रशासनाने अनेक विकासाची कामे बंद केली आहेत.

अंदाजपत्रकातील खर्चाबाबत प्राधान्यक्रम ठरवून 30 ते 40 टक्के काम करण्याबाबतचा निर्णय स्थायी समितीमार्फत प्रशासनाने घेतला, हे निश्चित या विषयाशी विसंगत आहे. एकीकडे निधी नाही म्हणून कामे थांबवायची आणि दुसरीकडे अशी चुकीची कामे करून उधळपट्टी करायची आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेने कचरा प्रक्रियेचे काम करण्यासाठी 530 रुपये दर निश्चित केला आहे.

प्रशासनाने परस्पर 500 रुपये दर निश्चित करून सर्वसाधारण सभेच्या ठरावाला वाटण्याच्या अक्षता लावल्या आहेत. शहरात प्रत्यक्ष जमा होणारा कचरा आणि प्रशासनाला ठेवलेला हा प्रस्ताव यातील कचर्‍यामध्ये प्रचंड तफावत आहे. पुणेकरांच्या कररूपी पैशाची या प्रकारे उधळपट्टी करण्यास आमचा विरोध आहे. त्यामुळे कचरा प्रक्रियेचे काम ठेकेदारांना विनानिविदा देण्याच्या प्रक्रियेला स्थगिती द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार आणि काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.