India Corona Update : 99 लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त, देशात अडीच लाख सक्रिय रुग्ण 

एमपीसी न्यूज : देशात कोरोना रुग्ण वाढीच्या वेगाला मागील काही दिवसांपासून ब्रेक लागला आहे. 24 तासांत वाढणा-या रुग्णांची संख्या 20 हजारांच्या आत आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 99 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज घडीला देशात अडीच लाख सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांत देशभरात 19 हजार 078 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. यासह देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 03 लाख 05 हजार 788 एवढी झाली आहे. त्यापैकी 99 लाख 06 हजार 387 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात आज घडीला 2 लाख 50 हजार 183 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मागील 24 तासांत नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक असून, 22 हजार 926 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे‌. गेल्या 24 तासांत 224 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशभरात 1 लाख 49 हजार 218 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.44 टक्के एवढा आहे तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.12 टक्के एवढं आहे.

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 17 कोटी 39 लाख 41 हजार 658 नमूने तपासण्यात आले आहेत त्यापैकी 8 लाख 29 हजार 964 नमूने शुक्रवारी (दि.1) तपासण्यात आले आहेत.

देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आज कोरोना लशीचं ड्राय रन सुरु झालं आहे. देशात आज 116 जिल्ह्यातील 259 शहरात ड्राय रन सुरू झाला आहे. महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांची या ‘ड्राय रन’साठी निवड केली गेली आहे. ज्यामध्ये पुणे, नागपूर, नंदुरबार व जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.