Pune : यशस्वी उद्योगासाठी गुणवत्ता, ग्राहककेंद्री दृष्टीकोन गरजेचा

एमपीसी न्यूज – ग्राहकाला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या ( Pune ) गरजा ओळखून गुणवत्ता, विश्वासार्हता जपत उत्पादन अथवा सेवा पुरविली, तर उद्योग यशस्वी होतो. समस्याभिमुख उद्योग सुरु करण्यावर भर हवा. ग्रामीण भागात उद्योग-व्यवसायाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहे. बाजारपेठेचा अभ्यास करून पूरक उद्योग सुरु करावेत. नोकरी मागण्यापेक्षा नोकऱ्या निर्माण करण्याचा दृष्टीकोन ठेवावा,” असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.

विद्यार्थी साहाय्यक समितीच्या उद्योजकता विकास केंद्रातर्फे आयोजित उद्योजकता परिषदेत दास ऑफशोर लिमिटेडचे अशोक खाडे, सह्याद्री फार्मचे विलास शिंदे, मार्क लॅब्स प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. वसुधा केसकर यांनी विद्यार्थ्यांना उद्योगांसाठी प्रेरित केले.
सेनापती बापट रस्त्यावरील देवांग मेहता सभागृहात झालेल्या उद्योजकता परिषदेच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थी साहाय्यक समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार होते.

प्रसंगी समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, विश्वस्त तुकाराम गायकवाड, ज्योती गोगटे, रत्नाकर मते, भाऊसाहेब जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी, कार्यकर्त्या सुप्रिया केळवकर, उद्योजकता विकास केंद्राचे प्रमुख सुरेश उमाप आदी उपस्थित होते. समितीचे आजी-माजी विद्यार्थी, उद्योजक या परिषदेत सहभागी झाले.

Pune : विजयस्तंभ अभिवादन दिनी बार्टी उभारणार 300 पुस्तक स्टॉलचे दालन

अशोक खाडे म्हणाले, “उद्योग सुरु करण्यापूर्वी त्या क्षेत्राचा अनुभव, सखोल ज्ञान घ्यावे. समर्पित भावनेतून, झपाटून काम करावे. आपल्या क्षमता, कमतरता, धोके आणि संधी याचा सातत्याने मागोवा घेत राहावा. कामातील गुणवत्ता, दूर दृष्टीकोन, योग्य नियोजन आणि समर्पण तुम्हाला यशाकडे नेते. रोजनिशी लिहा. अपयशावर मात करण्याचे कौशल्य आत्मसात करा. ग्रामीण भागातील व्यवसायाच्या संधी शोधून त्यावर काम करा. शेतीपूरक व्यवसाय काळाची गरज आहे.”

विलास शिंदे म्हणाले, “ग्रामीण भागात जितक्या अधिक समस्या, तितक्या अधिक उद्योगांच्या संधी आहेत. नोकऱ्यांचे कमी होत असलेले प्रमाण, तंत्रज्ञानाचा होणारा अंतर्भाव यामुळे पुढील काळात स्वयंरोजगार, व्यवसाय व उद्योग करण्यावर भर द्यायला हवा. गुणवत्ता आणि क्षमता चांगली असेल, तर छोट्या कल्पनेतून मोठा उद्योग उभारता येतो. शेतकऱ्यांनी मानसिकता बदलून शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहावे.”

डॉ. वसुधा केसकर म्हणाल्या, “ग्राहकांच्या तक्रारी आपल्या कामातील सुधारणा असतात. त्याकडे सकारात्मक पाहायला हवे. उद्योग सुरु करताना, वाढवताना अनेक अडचणी येतात. त्यावर मात करून खंबीरपणे सकारात्मक विचारांनी पुढे जावे. उद्योगांच्या नव्या संधींचा मागोवा घेऊन, आपण काय करू शकतो, हा विचार करावा. उद्योजकता हाच पुढील काळातील करिअरचा शाश्वत पर्याय आहे.

प्रतापराव पवार म्हणाले, “जोखीम पत्करण्याची तयारी नसल्याने मराठी माणूस उद्योगांत मागे पडतो. संकटाऐवजी संधींकडे पहा. भांडवल, वारसा यापेक्षाही व्यवसायातील शहाणपण अधिक महत्वाचे असते. ग्राहकांशी संवाद ठेवून त्यांच्या अडचणी, उत्पादन वा सेवेविषयी अभिप्राय जाणून घ्यायला हवा. उद्योगात सातत्य, चिकाटी, गुणवत्ता, वेगळेपण आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता असावी.”

यावेळी युवा उद्योजकांच्या चर्चासत्राचे, तसेच मुलाखतीचे आयोजन केले होते. समितीच्या वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशनही यावेळी झाले. सुरेश उमाप यांनी प्रास्ताविकात परिषदेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. अंगारकी मांडे हिने सूत्रसंचालन केले. रत्नाकर ( Pune ) मते यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.