Pune : अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या पिकांची जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडून पाहणी

एमपीसी न्यूज – जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शनिवारी (दि. २) पुरंदर, बारामती आणि इंदापूर तालुक्यातील झेंडेवाडी, काळेवाडी आणि सोनोरी गावातील अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्हाधिकारी राम यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानभरपाईबाबत तातडीने पंचनामे करून मदत करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसिलदार रुपाली सरनोबत, तालुका कृषि अधिकारी अंकुश बरडे, तहसिलदार, उप विभागीय कृषि अधिकारी, गट विकास अधिकारी व शेतकरी आदी उपस्थित होते.

सर्व प्रशासकीय यंत्रणांनी आपआपसात समन्वय ठेवून शेतकऱ्यांचे समाधान करावे, असे संबंधित शासकीय यंत्रणांच्या प्रमुखांना आदेश दिले. तत्पूर्वी जिल्हाधिकारी राम यांनी पुरंदर तालुक्यातील काळेवाडी येथील बाळासाहेब निवृत्ती काळे यांच्या वाल, पेरू आणि अंजीर बागेची पहाणी केली. उत्तम जगन्नाथ काळे यांच्या पेरू बागेची पहाणी केली. सोनोरी येथील सिमेंट नाला बांध याची पहाणी केली.

त्यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बारामती तालुक्यातील मोरगाव जवळील दंडेवाडी येथे कांदा व बाजरीच्या पिकांची अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी पिंपळी आणि काटेवाडी तसेच इंदापूर तालुक्यातील बोरी येथील नुकसानग्रस्त द्राक्ष पिकांची पाहणी केली. तसेच त्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली.

यावेळी शेतकऱ्यांनी मांडलेल्या अडचणींसंदर्भात जिल्हाधिकारी राम यांनी त्यांचे समाधान केले. प्रशासन सर्वतोपरी तुमच्या पाठीशी आहे. नुकसानभरपाई बाबत तातडीने पंचनामे करुन त्यांचा एकत्रित अहवाल शासनास पाठवून लवकरात लवकर मदत देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.