Pune : हौशी शेतकरी ! गाईचे डोहाळे जेवण, पैठणी परिधान करून मिरवणूकही काढली

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील (Pune) एका हौशी शेतकऱ्याने आपल्या लाडक्या गाईचं डोहाळे जेवण ठेवलं होतं. या शेतकरी कुटुंबाने गाई प्रती अशा प्रकारे संवेदना दाखवल्याने पुणे जिल्ह्यात हा कौतुकाचा विषय ठरला आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव येथे हा आगळावेगळा समारंभ पार पडला. हौसा नावाच्या खिल्लार गाईचे डोहाळे जेवण आणि ओटी भरण समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला. इतकच नाही तर या शेतकऱ्याने सुंदर पैठणी या गाईला नेसवत गावातून तिची मिरवणूक ही काढली. 
याप्रकरणी अधिक माहिती अशी, की मुलाच्या लग्न सोहळ्यात धंगेकर कुटुंबीयांना जातिवंत खिल्लार गाईचे वासरू भेट म्हणून आले होते. धंगेकर कुटुंबीयांनी या गाईच्या वासराचा घरातल्या व्यक्तीप्रमाणे सांभाळ केला. तिचं नाव हौसा ठेवलं. इतकच नाही तर जेव्हा हौसा आई होणार होती तेव्हा त्यांनी अतिशय सुंदर कार्यक्रम देखील केला.

या कुटुंबियांनी हौसाचा डोहाळे व ओटी भरण कार्यक्रम (Pune) ठेवला होता. त्या निमित्ताने तिला छान सजवले. सुंदर पैठणी तिच्या अंगावर टाकून गावभर तिची मिरवणूक काढण्यात आली होती. धंगेकर कुटुंबियांनी या कार्यक्रमात गावातील लोकांनाही सहभागी करून घेतले. या निमित्त महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आजूबाजूच्या परिसरातील विधवा महिलांना हळदीकुंकू कार्यक्रमाला बोलावून त्यांना सुवासिनीचा मान दिला. आणि त्यानंतर जेवणाने या सर्व कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.