Pune : 2019 च्या तुलनेत  2023 साली रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यवहारात तब्बल 90 टक्के नी वाढ

एमपीसी न्यूज – मागील वर्षभरात पुणे शहराची रिअल इस्टेट बाजारपेठ (Pune) ही भारतातील इतर मेट्रो शहरांच्या तुलनेत सर्वात वेगाने वाढणारी आणि परवडणारी बाजारपेठ ठरली आहे. पुनर्विक्री वगळून पुणे रिअल इस्टेट मार्केटमध्ये तब्बल 90 हजारांहून अधिक घरांची विक्री झाली आहे. 2019 च्या तुलनेत यामध्ये 90% वाढ झाल्याचेही पहायला मिळाले आहे. याचाच अर्थ पुणे रिअल इस्टेट मार्केटने गेल्या 4 वर्षांत त्यातही मागील वर्षी अभूतपूर्व कामगिरी केली आहे, अशी माहिती क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजित नाईकनवरे यांनी दिली.

2019 आणि 2023 चा विचार केल्यास पुणे शहरात 2023 मध्ये 90 हजारांहून अधिक घरांची विक्री झाली. याचाच अर्थ कोविड पूर्व काळाच्या तुलनेत 2023 च्या पहिल्या सहामाहीतच घरांची विक्री हे 40 टक्के नी वाढली आहे. याबरोबरच पुण्यात 2023 च्या तुलनेत विक्री झालेल्या घरांची सरासरी किंमत ही 63 लाख असून 2019 शी तुलना करता ती तब्बल 37% नी जास्त असल्याचे समोर आले आहे. यावरून असे लक्षात येते की घरांचा सरासरी आकार आणि किंमत या दोन्ही गोष्टी वाढत आहेत. शिवाय 2019 च्या तुलनेत 2023 मध्ये 1 कोटी किंमत असलेल्या घरांच्या विक्रीत 25% इतकी वाढ झाली आहे, अशी माहितीही नाईकनवरे यांनी दिली.

TDR : टीडीआर घाेटाळ्याची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करा; सत्ताधारी भाजप आमदाराची मागणी

2024 या येत्या नवीन वर्षांत देखील बांधकाम व्यवसाय क्षेत्राची ही घोडदौड कायम राहील असा अंदाज असून पुण्याचा विचार केल्यास मोठ्या घरांची मागणी वाढती असली तरी मध्यम आकाराची, परवडणाऱ्या किंमतीतील घरांची मागणी देखील मागील 2- 3 महिन्यांत पूर्वपदावर आल्याचे पाहायला मिळत आहे. अत्याधुनिक सोयीसुविधा आणि अॅमेनीटीज असलेल्या गृहप्रकल्पांना ग्राहकांची पसंती असल्याचे नाईकनवरे यांनी नमूद केले.

बांधकाम व्यवसाय क्षेत्रात गेल्या काही वर्षांत आलेल्या नियमनांमुळे भारतीय नागरिकत्व असलेले परदेशातील नागरिक, परदेशी नागरिकत्व असलेले भारतीय नागरिक यांकडून गुंतवणूकीच्या दृष्टीने सकारात्मकता पाहायला मिळत आहे असे सांगत रणजीत नाईकनवरे म्हणाले, “थेट परकीय गुंतवणूक,  पर्यायी गुंतवणूक निधी आणि अंशात्मक गुंतवणूक यांमुळे अनेक संधी बांधकाम व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होताना दिसत आहेत.

मागील काही वर्षांत या क्षेत्रावर असलेला सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास पुन:प्रस्थापित होत असताना को वर्किंग, को लिव्हिंग, वेअरहाऊसिंग, प्लॉटिंग, सेकंड होम्स आणि भाडेतत्त्वावर जागा देण्याच्या दृष्टीने होणारी गुंतवणूक यामध्ये देखील वाढ होईल असा अंदाज आहे. शहरात होणाऱ्या मेट्रो प्रकल्पामुळे मध्य भागात आणि मेट्रो मार्गिकेच्या आजूबाजूला असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती मिळत आहे. त्यामुळे सध्या चालू वर्षांत पुण्यात विक्री होत असलेल्या 90 हजार ते 1 लाख घरांची विक्री भविष्यात देखील कायम राहील असा (Pune) आमचा अंदाज आहे.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.