Pune Corona News : शेवटच्या कोरोना रुग्णाचा मृत्यू; शिवाजीनगरचे जम्बो कोविड सेंटर बंद

एमपीसीन्यूज : शिवाजीनगर येथील सीओईपी मैदानावरील जम्बो कोविड सेंटरमधील शेवटच्या साठ वर्षीय रुग्णाचा डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही पहाटे मृत्यू झाल्याने सेंटर शुक्रवारी अखेर बंद करण्यात आले.

कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी शिवाजीनगर येथील सीओईपीच्या मैदानावर जम्बो कोवीड सेंटर उभारण्यात आले. या सेंटरचा कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत चांगलाच फायदा झाला.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेसाठी महापालिकेने 23 मार्च 2021 पासून ‘जम्बो’ पुन्हा सुरू केले. शहरात 18 एप्रिलपासून कोरोनाची साथ उतरणीला लागल्याने पालिकेने 22 जूनपासून जम्बो बंद करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी 22 जूनला 25 रूग्ण उपचार घेत असल्याने हे सेंटर 30 जूनला बंद करण्याचा निर्णय घेतला.

नियोजनानुसार, 30 जूनपूर्वी 24 रूग्ण कमी झाले. मात्र, त्यानंतर शेवटच्या रूग्णाची प्रकृती खालावल्याने जम्बो बंद करण्यात आले नाही. या रूग्णाच्या तपासणीसाठी गुरूवारी ससून रूग्णालयाच्या डॉक्टरांना पाचारण करण्यात आले होते. या रूग्णांची प्रकृती गंभीर होती. मात्र, शेवटचा रूग्ण बरा करूनच जम्बो बंद करण्याचा निश्चय प्रशासनाने घेतला होता.

मात्र, पालिकेने केलेल्या शर्थीच्या प्रयत्नानंतरही या रूग्णाचे प्राण वाचविता आले नाही. शुक्रवारी पहाटे या रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे हे सेंटर शुक्रवारी बंद करण्यात आले. दरम्यान, केंद्राने व राज्याने कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा इशारा दिला असल्याने पालिका प्रशासनाने या रूग्णालयाचे स्ट्रक्टचरल ऑडीट करण्याच्या सूचना संबधित कंपनीस दिल्या आहेत. त्यानंतर हे सेंटर ठेवायचे की काढायचे याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.