Pune Corona Update: शहरातील 94 टक्के रुग्णांची कोरोनावर मात, उरले फक्त पावणेचार टक्के सक्रिय रुग्ण

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील कोरोना संसर्गाची परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणाखाली आल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. शहरातील तब्बल 93.65 म्हणजेच जवळपास 94 टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आता शहरात केवळ पावणेचार टक्के सक्रिय कोरोना रुग्ण उरले आहेत. 

पुणे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या आता सहा हजारपर्यंत खाली आली आहे. सध्या शहरात सहा हजार चार कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाणही बऱ्यापैकी कमी झाले आहे. शहरात काल (मंगळवारी) 241 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे आतापर्यंत शहरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या एक लाख 60 हजार 86 इतकी झाली आहे.

शहरात मंगळवारी 639 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत शहरातील एक लाख 49 हजार 919 म्हणजेच जवळपास दीड लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. हे प्रमाण एकूण कोरोनाबाधितांच्या 93.65 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही आता लक्षणीय कमी झाले आहे. मंगळवारी 22 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची शहरात नोंद झाली. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बळींचा आकडा 4 हजार 163 झाला आहे. शहरातील मृत्यूदर 2.6 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. हे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

शहरात आतापर्यंत सात लाख 25 हजार 743 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. त्यात 2,331 चाचण्या काल (मंगळवारी) एका दिवसात झाल्या आहेत.

शहरातील कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी तो पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होईपर्यंत पुणेकरांना काळजी घ्यावी लागणार आहे.

नागरिकांनी मास्कचा वापर सुरूच ठेवावा तसेच सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन करावे. सॅनिटायझरचा वापर करावा. प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून स्वतः सुरक्षित राहावे तसेच आपल्या कुटुंबाच्या व समाजाच्या सुरक्षिततेसाठी यापुढेही काळजी घ्यावी, असे आवाहन पुणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.