Pune Crime News : मामलेदार कचेरीत चोरीचा प्रयत्न फसला; अन्य दोन घरफोड्यांमध्ये पाच लाखांचा ऐवज लंपास

एमपीसीन्यूज : पुणे शहरात बंद फ्लॅट अन दुकाने फोडण्याचे प्रकार घडत असताना आता मामलेदार कचेरीत चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर हडपसर आणि सिंहगड रोड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दोन फ्लॅट फोडत चोरटयांनी साडे पाच लाखांचा ऐवज चोरून नेला आहे.

याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात प्रमोद घाडगे (वय 48) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रमोद हे शासकीय नोकर असून, ते मामलेदार कचेरी येथे नगर भूमापन अधिकारी आहेत. मामलेदार कचेरीचे कार्यालय बंद असताना अज्ञातांनी कार्यालयाच्या अभिलेख कक्षाचे लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच दरवाजा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. चार दिवसांपूर्वी हा प्रकार घडला आहे. अधिक तपास खडक पोलीस करत आहेत.

तर हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंद फ्लॅट फोडून चोरटयांनी 4 लाख 97 हजार रुपयांची ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी सीमा रोकडे (वय 34) यांनी फिर्याद दिली आहे.

रोकडे यांचे दिर विजय रोकडे हे मांजरी भागात राहतात. त्यावेळी चोरट्यांनी घराचा कडी कोयडा उचकटून आत प्रवेश केला. तसेच घरातील कपाटातून दागिने व रोकड असा 4 लाख 97 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. दोन दिवसांपूर्वी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली.

तसेच सिंहगड रोड येथे घराचे सेफ्टी डोअर तोडून आत शिरलेल्या चोरट्यांनी अमेरिकेन डॉलर आणि इतर असा 45 हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे. याप्रकरणी राहुल तिवारी (वय 35) यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.