Pune : डेक्कन क्वीन, प्रगती, सिंहगड आणि इंटरसिटी एक्स्प्रेस 16 ऑगस्ट पर्यंत रद्द

एमपीसी न्यूज- सातत्याने पडणारा पाऊस आणि खंडाळा ते कर्जत घाट क्षेत्रात दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे पुणे ते मुंबई शहरांना जोडणाऱ्या आणि विशेषत: नोकरदारांच्या गाड्या अशी ओळख असलेल्या डेक्कन क्वीन, प्रगती, सिंहगड आणि इंटरसिटी एक्स्प्रेस या गाड्या शुक्रवार (दि. १६) पर्यंत रद्द करण्यात आल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले आहे. त्यामुळे चाकरमान्यांची मोठी गैरसोय होणार आहे.

पुणे रेल्वे स्थानकातून जाणाऱ्या अन्य लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द करण्यात आलेल्या आहेत. तसेच, कोल्हापूर शहरातील पुरामुळे कोल्हापूरला जाणाऱ्या कोयना एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेस आणि सह्याद्री एक्स्प्रेस, तसेच मुंबई-गदग-मुंबई एक्‍स्प्रेस, पुणे-भुसावळ-पुणे एक्‍स्प्रेस या गाड्या देखील १६ ऑगस्टपर्यंत रद्द केल्या आहेत.

पुणेमार्गे जाणारी यशवंतपूर-निजामुद्दीन एक्‍स्प्रेस दौंड-मनमाड मार्गे वळविण्यात आली आहे. तर, म्हैसूर-उदयपूर सिटी एक्‍स्प्रेस दौंड-पुणे मार्गे वळविण्यात आली आहे. पनवेल-नांदेड एक्‍स्प्रेस १० आणि १२ ऑगस्टला पुणे स्थानकातून धावेल, तर पनवेल-नांदेड विशेष गाडी ११ ऑगस्टला सोडण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.