Pune : टिल्लू कुटुंबातील ‘एकपात्रीची एकसष्टी’चा राजधानीत मानपत्र देऊन सन्मान

एमपीसी न्यूज : पुण्यासह महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील रसिकांना (Pune) एकपात्री कलेद्वारे खिळवून ठेवणाऱ्या टिल्लू कुटुंबातील ‘एकपात्रीच्या एकसष्टी’ने थेट दिल्लीत यशाचा झेंडा रोवला असून मराठी भाषकांच्या संघटनांतर्फे टिल्लू कुटबियांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

दिल्ली महाराष्ट्रीय शैक्षणिक व सामाजिक संस्था (आराम बाग), महाराष्ट्रीय स्नेहसंवर्धन समाज (पहाडगंज), मराठा मित्र मंडळ (करोल बाग) आणि नवचैतन्य हास्ययोग परिवार (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र रंगायतन पहाडगंज येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

टिल्लू कुटुंबातील तीन पिढ्यांनी एकपात्री या कलेला वाहून घेतले आहे. 1961 साली ज्येष्ठ एकपात्री कलाकार मधुकर टिल्लू यांनी विनोदी प्रसंगांची गुंफण करून एकपात्राची नवी शैली रुजवली. त्यांच्याकडून हा वारसा मुलगा प्रसिद्ध एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू आणि नात हर्षदा टिल्लू यांच्याकडे आला आहे. सलग गेली 61 वर्षे टिल्लू कुटुंबिय एकपात्री कलेद्वारे रसिकांचे मनोरंजन करीत आहे, ही रंगभूमीच्या इतिहासात प्रथमच घडलेली गोष्ट आहे.

Pimpri News : महापालिका प्रशासकांची सर्वसाधारण सभा नागरिकांसाठी खुली करा –  अजित गव्हाणे

एकपात्री कलेच्या माध्यमातून रंगभूमी आणि कलेसाठी दिलेल्या योगदानाची (Pune) दखल घेऊन इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशनचे अध्यक्ष अध्यक्ष, माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते मकरंद टिल्लू आणि हर्षदा टिल्लू यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी डॉ. दीपक टेम्पे, अलका कानतुटे, विठ्ठल काटे, विलास कानतुटे, प्रशांत साठे, राजीव गोडबोले, रमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

सत्कार सोहळ्यानंतर मकरंद टिल्लू आणि हर्षदा टिल्लू यांनी ‘हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा’ हा एकपात्री कार्यक्रम सादर केला. हशा आणि टाळ्यांनी दाद देत रसिकांनी एकपात्री कलेचा आनंद लुटला.

एकपात्री या कलेचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान केल्याबद्दल महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरील रसिकांच्या वतीने संस्थाविषयी आभार व्यक्त करतो. सध्याच्या धकाधकीच्या काळात हरवत चाललेले हास्य रसिकांपर्यंत पुन्हा पोहोचविण्याचे कार्य करता येत आहे यात समाधान आहे, अशा भावना या प्रसंगी मकरंद टिल्लू यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अलका कानतुटे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.