Pune : आरोग्य विभागाने जिल्ह्यात कुष्ठरोग जनजागृती अभियान यशस्वी करावे – राजेश देशमुख

एमपीसी न्यूज : कुष्ठरोग व क्षयरोगाच्या जनजागृतीसाठी (Pune ) जिल्ह्यात 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार असून आरोग्य विभागाने जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबवून यशस्वी करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. संजय दराडे, पुणे महानगरपालिकेचे वैद्यकिय अधिकारी डॉ. इरफान लोहारे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे, जिल्हा क्षयरोग केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयंत काळकुटे, जि.प. उपशिक्षणाधिकारी मोमीन अस्माबेगन मोहम्म्द इमादोद्दीन आदी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले, या अभियानात आरोग्य विभागाने चांगल्याप्रकारे नियोजन करून जिल्ह्यातील प्रत्येक घरात कुष्ठरोग व क्षयरुगणांचे सर्वेक्षण करावे. गट शिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख व मुख्याद्यापक यांना निर्देश देवून प्रत्येक शाळेत जनजागृतीची शिबिरे घ्यावीत.

शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीबरोबरच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घरातील सदस्यांची कुष्ठरोग व क्षयरुणांची माहितीची (Pune ) पत्रके भरून घ्यावीत. अभियानात विविध यंत्रणांचा सहभाग घ्यावा.

उद्योग क्षेत्रातही या अभियानाची अंमलबजावणी करावी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे 25 गावे दत्तक देण्यात यावीत. शासनाच्या विविध योजना राबविण्यात आघाडीवर असलेल्या ग्रामपंचायतींना अभियानात सहभागी करून घ्यावे. पुणे जिल्हा कुष्ठरोग व क्षयरोग मुक्त जिल्हा करण्यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

असे आहे संयुक्त अभियान:

आशा कार्यकर्ती व पुरूष स्वयंसेवकांचे पथक तसेच आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन क्षयरोग व कुष्ठरोगाच्या लक्षणांची तपासणी करण्यासह माहिती घेणार आहेत. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नवीन रुग्ण रोगाच्या सुरुवातीच्या टप्यायतच ओळखून उपचाराखाली यावा यासाठी सर्व नागरिकांना याबाबतची प्राथमिक माहिती सातत्याने देण्यात येत आहे.

कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत आरोग्य शिक्षण, लवकर निदान, लवकर उपचार याप्रमाणे नियोजन करून रोगप्रसाराची साखळी खंडित करण्यासाठी हे अभियान महत्वाचे ठरणार आहे.

पुणे जिल्ह्यात नोव्हेंबर 2023 अखेर 632 कुष्ठरुग्ण औषधोपचाराखाली आहेत. कुष्ठरोग दर हा प्रति दहा हजार लोकसंख्येत 0.60  इतका आहे. एप्रिल2023 ते नोव्हेंबर 2023 अखेर 318 इतके नवीन कुष्ठरुग्ण शोधण्यात आले असून ते नियमित औषधोपचाराखाली आहेत. तसेच जानेवारी 2023 ते नोव्हेंबर अखेर 6 हजार 132 क्षयरुग्ण औषधोपचाराखाली आहेत.

संयुक्त कुष्ठरुग्ण शोध व सक्रिय क्षयरोग शोध अभियानात जिल्ह्यात 4 हजार 118 पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. नागरी व ग्रामीण भागातील मिळून 56 लाख 13 हजार 705 लोकसंख्येची तपासणी करण्यात येणार असून सन 2027 पर्यंत कुष्ठरोग मुक्त जिल्हा करावयाचा मोहिमेचा उद्देश आहे.

कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध अभियान कालावधीत घरोघरी तपासणी करण्यात येणार असून यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही  देशमुख यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.