Pune : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा उद्या मेळावा

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Pune) पार्श्वभूमीवर 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता महाविकास आघाडीचा मेळावा काँग्रेस भवन परिसरात होणार आहे. स्वतः शरद पवार या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याने ते काय मार्गदर्शन करणार, याकडे लक्ष लागले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, चंद्रकांत हंडोरे, डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. बाबा आढाव हे सुद्धा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. आम आदमी पार्टी, जनता दल सह घटक पक्षाचे कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिली.

यावेळी शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार कशा प्रकारे विजयी करता येणार, यासाठी ही नेतेमंडळी मार्गदर्शन करणार आहेत. त्या दृष्टीने काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी काँग्रेसतर्फे (Pune) 20 जणांनी अर्ज भरले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, ऍड. अभय छाजेड, प्रवक्ते गोपाळ तिवारी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.