Pune news : नियोजन विभागाचे संपूर्ण कामकाज यावर्षीपासून संगणकीय प्रणालीद्वारे : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

एमपीसी न्यूज – नियोजन विभागाचे कामकाज या आर्थिक वर्षापासून संपूर्णत: संगणकीकृत प्रणालीद्वारे करायचे असून सर्व शासकीय विभागांनी जिल्हा नियोजन समितीच्या (Pune news) निधीतून राबवण्यात येणाऱ्या कामांवरील संनियंत्रणासाठी ‘इंटिग्रेटेड प्लॅनिंग ऑफीस ऑटोमेशन सिस्टीम’ (IPAS –‘आयपास’) प्रणालीचा प्रभावी वापर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे नियोजन विभागाद्वारे आयोजित ‘आयपास’ प्रणाली प्रशिक्षण कार्यशाळेत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख बोलत होते. यावेळी यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. अपर्णा गुरव तसेच सर्व शासकीय कार्यान्वयीन यंत्रणांचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, 18 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयानुसार ‘आयपास’ प्रणालीचा उपयोग करणे आवश्यक आहे. याबाबत प्रशिक्षण होऊनही गेल्या दोन वर्षात कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावामुळे आणि तांत्रिक अडचणीमुळे प्रणालीचा वापर नियमित कामकाजात करणे सर्वच शासकीय कार्यालयांना शक्य झाले नाही. परंतु सन 2022-23 या आर्थिक वर्षापासून नियोजन विभागाचे संपूर्ण कामकाज हे या प्रणालीद्वारेच करायचे आहे.

Graduate Election : पदवीधर निवडणुकीस स्थगिती देऊन निवडून प्रक्रिया पुन्हा राबवावी – भारतीय मराठा महासंघ

जिल्हा नियोजन समिती, लोकप्रतिनिधी तसेच सर्व कार्यान्वयीन यंत्रणा या प्रणालीच्या माध्यमातून जोडल्या जाणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कामकाज संगणकीकृत होवून कामकाज व कारभार सुलभ, लोकाभिमुख, पारदर्शी होण्यासह प्रशासन गतिमान होण्यास मदत होणार आहे, असे त्यांनी सांगितले.(Pune news) जिल्हा नियोजन अधिकारी मारकळे म्हणाले, नियोजन विभागाद्वारे राबविण्यात येण्याऱ्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), आमदार स्थानिक विकास कार्यक्रम, डोंगरी विकास कार्यक्रम, प्रादेशिक पर्यटन कार्यक्रम आदी सर्व नियमित योजनांकरिता प्राथम्याने ‘आयपास’ प्रणालीचा वापर सुरु करण्यात आला आहे. लवकरच खासदार स्थानिक विकास कार्यक्रम या योजनेकरिताही ही प्रणाली लागू करण्यात येणार आहे.

2022-23 या आर्थिक वर्षापासून प्रणालीचा वापर अनिवार्य करण्यात आला असून आणि पुढील वर्षाचा सन 2023-24 चा प्रारुप आराखडा प्रणालीद्वारेच सादर करावा.(Pune news) या प्रणालीचा वापर करताना अडचणी आल्यास जिल्हा नियोजन कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही मरकळे यांनी केले. संगणकीय प्रणालीचे प्रशिक्षण व सादरीकरण सहायक जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. अपर्णा गुरव यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.